नवी मुंबई : शहरात बेकायदा वाहन पार्किंगचा प्रश्न जटिल झाला आहे. जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावर स्वयंपाकघरात वापरावयाच्या गॅस सिलिंडर भरलेले ट्रक दुतर्फा पार्क केले जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर ट्रक व संबंधित एजन्सी मालकावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रदीप बी. वाघमारे यांनी केली आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावर जुहूगाव येथील माता गावदेवी मंदिर शेजारी एच.पी. घरगुती गॅस सिलिंडर वितरण एजन्सी आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला एजन्सीचे गोदाम आहे. या गोदामात रिकामे व भरलेले गॅस सिलिंडर ठेवले जातात. त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर चोवीस तास गॅस सिलिंडर भरलेल्या ट्रकचा राबता दिसून येतो. गावाच्या चारी बाजूकडील रस्त्यांवर सिलिंडरने भरलेले ट्रक उभे केल्याचे दिसून येते.
अनेकदा रस्त्यावरच ट्रक उभे करून सिलिंडर वितरणाचे काम केले जाते. समोरच असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारातसुध्दा गॅस सिलिंडरने भरलेले ट्रक उभे केले जातात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सिलिंडरने भरलेल्या ट्रकना रस्त्यावर पार्क करण्यास मज्जाव करावा तसेच संबंधित एजन्सी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदीप वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात आठ दिवसांपूर्वी लेखी तक्रारसुध्दा केली आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या संबंधित विभागाकडून या मागणीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.
गॅस सिलिंडरचे वितरण करणाऱ्या संस्थेला सिलिंडर साठविण्यासाठी गरजेनुसार गोदामाची व्यवस्था करावी लागते. आगीचा धोका टाळण्यासाठी त्या ठिकाणी नियमानुसार अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणेसुध्दा बंधनकारक आहे. परंतु सदर एजन्सी मालकाने या सर्व नियमांना केराची टोपली दाखविल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. नुकतेच मुंबई दोन ठिकाणी गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले होते.