कळंबोली वाहतूक शाखेची कमान कोसळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:59 PM2019-11-14T23:59:48+5:302019-11-14T23:59:57+5:30
कळंबोली सर्कल जवळील वाहतूक शाखा येथील कमानीला गंज तसेच कमकुवत झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे.
कळंबोली : कळंबोली सर्कल जवळील वाहतूक शाखा येथील कमानीला गंज तसेच कमकुवत झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. या सर्व्हिस रोडवर वाहनांची २४ तास वर्दळ तर बाजूलाच वाहतूक पोलीस ठाणे असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे ये-जा चालू असते. यामुळे केव्हाही अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
कळंबोली वाहतूक पोलीस ठाणे समोरील सर्व्हिस रोडवर सर्कलपासून जवळ असलेल्या प्रवेशद्वारावर ही कमान उभारण्यात आली आहे. या कमानीला जवळपास ११ वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले आहे. कमानीवरील पत्रा गंजलेल्या अवस्थेत खाली गळून पडला आहे. या कमानीवरील ११ वर्षांपूर्वी वाहतूक पोलीस ठाणे कळंबोली असे लिहण्यात आले होते. पत्रा गळाल्याने लिहिलेले नावही नाहीसे झाले आहे. गंज लागल्याने कमान कमकुवत झाली असून केव्हाही ती कोसळून अपघात घडू शकतो. सर्व्हिस रोडवरून लहान-मोठी वाहने जातात. अवजड वाहनेही पार्किंगसाठी आत घुसखोरी करतात. वाहनांचा धक्का लागला तरी ती कोसळण्याची दाट शक्यता आहे. बाजूलाच वाहतूक पोलीस ठाणे असल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात याच कमानीखालून होत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रवासी तसेच नागरिक महामार्गावरील बसस्टॉपवर जाण्यासाठी याच सर्व्हिस रोडचा वापर करतात. यामुळे महापालिकेने याकडे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.