कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:16 AM2019-11-27T02:16:50+5:302019-11-27T02:19:08+5:30

अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

The possibility of collapsing the Buruj of Korlai fort | कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता

कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई : अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये खाडीच्या बाजूची तटबंदी कोसळली आहे. अनावश्यक झुडपे व वृक्ष हटविले नाहीत तर गडाच्या चारही बाजूची तटबंदी व बुरुजांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.

गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून, रायगड जिल्ह्यास हे वैभव मोठ्या प्रमाणात लाभले आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडसह अनेक महत्त्वाचे गड व जलदुर्ग जिल्ह्यामध्ये असून, त्यामध्ये अलिबागजवळील कोर्लईचा समावेश आहे. अलिबागवरून मुरूड-जंजिऱ्याकडे जातानाच्या डोंगरावर हा किल्ला आहे. जवळपास एक किलोमीटर लांबी व ३० मीटर रुंदीचा किल्ला दुर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे. दुर्गभ्रमंती करणारे तरुण व इतिहासप्रेमी नागरिकांची पावले कोर्लईकडे वळू लागली आहेत.

गडावरील मंदिर, चर्च, जुन्या बांधकामाचे अवशेष, प्रत्येक बुरुजावर बसविलेल्या तोफा व गडावरून दिसणारे कुंडलिका खाडीचे सौंदर्य यामुळेही येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गडाच्या पायथ्याशी असणा-या बीपीटीच्या लाइट हाउसमधून किल्ल्यावर जाण्यासाठी छोटी पायवाट आहे. बीपीटी व्यवस्थापनाने लाइट हाउसच्या छतावर जाऊन समुद्र व गडाची तटबंदी पाहण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय इतर दोन बाजूंनी गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. गडावरील मंदिर व चर्चच्या परिसराची पुरातत्त्व विभागाकडून देखभाल केली जात आहे. कर्मचाºयांची नियुक्तीही नियुक्ती केली आहे. कर्मचाºयांकडून गडाच्या मुख्य भागाची चांगल्या प्रकारे देखभाल होत असली तरी खाडीच्या बाजूच्या भागात वाढलेले गवत अद्याप काढलेले नाही. यामुळे भटकंती करणाºयांना अडथळे येऊ लागले आहेत.

गडाच्या बुरूज व तटबंदीची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये एक बाजूच्या तटबंदीचा काही भाग कोसळला आहे. चारही बाजूला बुरुजांसह तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. वृक्षांच्या मुळ्यांमुळे तटबंदी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अनावश्यक वाढलेली झुडपे तत्काळ काढणे आवश्यक आहे. ती काढली नाहीत तर भविष्यात गडाचा भाग कोसळण्यास सुरुवात होईल व किल्ल्याचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. गडावर येणाºया पर्यटकांना माहिती उपलब्ध होईल, असे फलक लावलेले नाहीत. गडाच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. राज्यातील सर्वाधिक तोफा असलेल्या गडावर कोर्लईचाही समावेश होतो. काही तोफांसाठी गाडा तयार करण्यात आला आहे. काही अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तोफांची देखभाल करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.


गडावरील पाण्याचा हौद
गडाच्या बालेकिल्ल्यामध्ये बंदिस्त हौद आहे. या हौदामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. या पाण्याचा गडावरील वृक्ष व हिरवळ विकसित करण्यासाठी वापर केला जातो. पायथ्याशी असणाºया लाइट हाउसलाही येथून पाणीपुरवठा केला जात आहे. किल्ल्याच्या मुख्य बालेकिल्ल्यामध्ये असलेल्या हौदामधील पाणी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

कोर्लईचा इतिहास
पोर्तुगिजांचे वर्चस्व असलेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये रेवदंडाचाही समावेश होते. येथून जवळच चौलजवळील खडकावर १५२१ मध्ये किल्ला बांधण्याची परवानगी पोर्तुगिजांनी निजामाकडे मागितली होती. १५९२ मध्ये येथे तटबंदी बांधण्याचा प्रयत्न झाला; परंतु निजामाने त्यास विरोध करून स्वत:च किल्ला बांधला.

दोन वर्षांनंतर पोर्तुगिजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. जवळपास १४७ वर्षे त्यांचे वर्चस्व राहिले. १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी सुभानजी माणकर यांच्यावर कोर्लईच्या मोहिमेची जबाबदारी सोपविली व हा किल्ला स्वराज्यात आणला.


गडावरील सद्यस्थिती
गडाच्या पायथ्याशी बीपीटीचे लाइट हाउस असून, त्यावरून समुद्र व गडाची तटबंदी पाहता येते.
गडाच्या प्रत्येक बुरुजावर तोफा ठेवण्यात आल्या आहेत.
गडावर चर्च व इतर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष पाहावयास मिळतात.
गडाच्या प्रवेशद्वारावर एक ब्रांझच्या सिंहाचे प्रतीक असून, ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.
गडाच्या बालेकिल्ल्याच्या शिखरावर गरुडाचे चित्र आहे. माझ्या तावडीतून उडणाºया माशांशिवाय कुणाची सुटका नाही, असे वचन कोरले आहे.
गडाची तटबंदी एक बाजूला पडली आहे.
गडाची तटबंदी व बुरुजांमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत.

Web Title: The possibility of collapsing the Buruj of Korlai fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.