मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:53 PM2019-08-03T22:53:48+5:302019-08-03T22:54:04+5:30

पाण्याची पातळी ८७.५0 मीटर; नदीपात्राकडील गावांनाही दिला इशारा

The possibility to fill the Morbe Dam at any moment | मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता

मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता

googlenewsNext

नवी मुंबई : धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मोरबे धरणाची पातळी ८७.५० मिटरपर्यंत वाढली आहे. कोणत्याही क्षणी धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली असून नदी पात्राच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी पात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने खालापूर तालुक्यामधील मोरबे धरण विकत घेतले आहे. धरणामध्ये ८८ मिटर पर्यंत पाणी साठा करता येतो. पावसाळा सुरू होण्यापुर्वी धरणातील पातळी ७० मिटरपेक्षा खाली आली होती. परंतु जुन अखेरपासून धरण परिसरात नियमीत पाऊस सुरू झाला असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढू लागली आहे. शनिवारी पहाटेपर्यंत २९३४ मी. मी. एवढा पाऊस धरणाच्या परिसरात पडला होता. सकाळी पाण्याची पातळी ८६.८० मीटर एवढी झाली होती. सायंकाळी हे प्रमाण ८७.५० मीटरपर्यंत वाढले होते. रविवारी धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी याविषयी रायगडचे जिल्हाअधीकारी यांना पत्र देवून धरणातील पाणी साठ्याची माहिती दिली आहे. धरण लवकरच भरणार असून दोन वक्राकार दरवाजे उघडावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोरबे धरणाचे दरवाजे उघडून धारवी नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडून दिले जाणार आहे. यामुळे नदीच्या काठावरील गावांमधील नागरिकांनी नदी पात्रामध्ये जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातील पाणी साठा वाढल्यामुळे नवी मुंबईकरांचा पुढील वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे. आॅगस्ट २०२० पर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध होवू शकते. महापालिकेने आठवड्यातून एक दिवस सायंकाळी पाणी कपात सुरू केली होती. तीही पंधरा दिवसांपुर्वीच बंद करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने लवकरच मोरबे धरण परिसरात जलपुजन करण्यात येणार आहे.

शहरात मुसळधार
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्येही दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरामध्ये २ वृक्ष कोसळण्याची घटना घडली आहे. एक घरही पावसामुळे पडले असून एक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली आहे.

मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे. याविषयी जिल्हाअधिकारी यांना माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडून पाणी मुळ नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.
- मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण

Web Title: The possibility to fill the Morbe Dam at any moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.