पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता; नालेसफाईच्या कामातील निष्काळजीपणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:39 AM2019-06-02T00:39:38+5:302019-06-02T00:40:11+5:30
नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या सिडको वसाहतीत दरवर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे मे महिन्यात पूर्ण केली जातात;
कळंबोली : कळंबोली परिसरातील नालेसफाईचे काम वेळेत सुरू करण्यात आले नाही. खांदा वसाहत आणि कळंबोलीत फक्त चेंबरच्या खालची माती आणि गाळ काढण्यात आला आहे. मात्र, बाकी ठिकाणी साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर या सिडको वसाहतीत दरवर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे मे महिन्यात पूर्ण केली जातात; परंतु सिडकोने यावर्षी उशिरा नालेसफाईला सुरुवात केली. आणि तीही कुठे केली आणि कुठे नाही. खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये जवळपास ५० कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नाले आहेत. रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा या नाल्यामध्ये होतो. त्याची जोडणी होल्डिंग पॉइंटला करण्यात आलेली आहे. मात्र, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि कचरा जातो, त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबते. या व्यतिरिक्त प्लॅस्टिक जाऊन अडकत असल्याने पाण्याला अडथळे निर्माण होतात. तीच परिस्थिती कळंबोली वसाहतीची असून २५ ते ३० कि. मी. लांबीचे पावसाळी नाले या ठिकाणी आहेत. २६ जुलै २००५ साली नाले तुंबल्यामुळे या भागात पाणी भरले होते.
बाहेर काढलेली माती नाल्याच्याच बाजूला
सिडकोने नालेसफाई केली खरी. मात्र, त्यातील गाळ बाजूलाच टाकला आहे. पावसाळा तोंडावर आला तरी ही माती उचलण्यात आली नाही. पावसाळ्यात हा कचरा पुन्हा नाल्यात जाऊन ते तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने बाहेर काढलेला हा गाळ त्वरित उचलण्याची मागणी अजिनाथ सावंत यांनी केली आहे.
नालेसफाई झाली नसल्याचे मुख्य कारण पुढे आले. तेव्हापासून सिडको दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमध्ये साचलेली माती, गाळ आणि कचरा बाहेर काढते. हे काम स्थानिक मजूर संस्थांना दिले जाते; परंतु या वर्षी खांदा वसाहतीत आणि कळंबोलीला उशिरा नालेसफाई सुरू झाली आहे.