नवी मुंबई- नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून वाशी पुलाच्या डागडुजीचं काम पुढे ढकललं असल्याची माहिती दिली आहे. पुलाच्या दुरूस्तीच्या तारखांमध्ये बदल झालेला असून आज (ता- 23 जानेवारी) सुरू होणार काम आता 1 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी पुलाच्या दुरूस्तीचं काम सुरू होणार असून हे काम 21 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. याआधी 23 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहणार होता. पण आता वाहतूक विभागाने पुलाच्या दुरूस्तीचं काम एक आठवड्यासाठी पुढे ढकललं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग 1 फेब्रुवारीला रात्री 1 वाजता पुलाचं काम सुरू करणार असून ते काम 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत चालणार आहे.
सायन-पनवेल मार्गावरील नव्या वाशी खाडी पुलावर मुंबईहून पुणे तसंच गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण जास्त असलेल्या या मार्गावरील वाशी खाडी पुलाच्या लोखंडी जॉइंडरची झीज झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलं आहे.
पुलाची दुरूस्ती सुरू असताना 20 दिवस पूल वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे गाड्यांची वाहतूक इतर मार्गिकेवरून वळविण्यात आली आहे.
असा करा प्रवास ?- नवी मुंबईहून मुंबईकडे येण्यासाठी मुंबई-वाशी लेनचा वापर करा.- मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या वाशी पुलावरून वळविण्यात आली आहे.- जूना वाशी पूल चारचाकी गाड्या, हलव्या मोटार गाड्या आणि आप्तकालिन गाड्यासाठी (अॅम्ब्युलन्स, काही बसेस) खूला असेल. जड वाहनांना या पुलावरून प्रवास करता येणार नाही. - जड वाहनांना ऐरोली पुलावरून प्रवास करता येईल. - नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड वाहनांना इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून जाऊन, विक्रोळी मार्गे ऐरोली टोल नाका असा प्रवास करावा लागेल. - जुन्या खाडी पुलावर अवजड वाहनांना बंदी असल्यामुळे मुंबईबाहेर जाणारी आवजड वाहतूक मानखुर्द येथून घाटकोपर लिंक रोडवरून ऐरोली-दिवा पुलावरून पटनी रोड व त्यापुढे ठाणे-बेलापूर मार्गावरून पुढे जाण्यासाठी पार्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.