साने गुरुजी स्मारकाच्या मार्गात खड्ड्यांचे अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:01 AM2018-05-12T02:01:35+5:302018-05-12T02:01:35+5:30
माणगावजवळील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे जाणाऱ्या रोडची प्रचंड दुरवस्था झाली आहे. १५ वर्षे पाठपुरावा करूनही पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही
नामदेव मोरे
नवी मुंबई : माणगावजवळील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे जाणाऱ्या रोडची प्रचंड दुरवस्था झाली आहे. १५ वर्षे पाठपुरावा करूनही पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही. महापुरुषाच्या स्मारकाकडे जाण्यासाठी राज्यातील लोकप्रतिनिधींनी निधीच उपलब्ध करून दिला नाही. अखेर उत्तरप्रदेशमधील खासदाराच्या ८० लाख रुपयांच्या निधीतून रोडचे काम केले जाणार असून आचारसंहितेमुळे पावसाळ्यानंतरच रोडचे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वाधिक ऐतिहासिक योगदान लाभलेला जिल्हा म्हणून रायगडचा देशभर नावलौकिक आहे. परंतु जिल्ह्यातील राष्ट्रीय स्मारकांची योग्य देखभाल केली जात नाही. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गावातील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे गावात स्मारकाच्या भूमिपूजनाच्या पाट्या फक्त शिल्लक आहेत. चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाच्या स्मारकाचीही योग्य देखभाल केली जात नाही. माणगावजवळील वडघर येथे ३६ एकर जमिनीवर १९९८ मध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. ११ नोव्हेंबर २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. १३ फेब्रुवारी २०१० मध्ये दुसºया टप्प्याचे काम सुरू केले व २५ जानेवारी २०१४ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते दुसºया टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. गुरुजींच्या विचारांचा वारसा जोपासणाºया या स्मारकामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. १५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी, तरुण व नागरिक प्रत्येक वर्षी स्मारकामधील विविध शिबिरांना हजेरी लावत आहेत. परंतु या स्मारकाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळून तीन किलोमीटर आतमध्ये वडघर गावात हे स्मारक आहे. स्मारकाकडे जाण्यासाठीच्या रोडची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रोडवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रोड चांगला नसल्याने स्मारकापर्यंत एस.टी. बसही जात नाही. या परिसरातील नागरिकांना तीन ते पाच किलोमीटर पायपीट करून मुख्य रोडवर एस. टी. बसेससाठी यावे लागत आहे. अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर पायपीट करून शाळेत जावे लागत आहे. राष्ट्रीय स्मारकामध्ये होणाºया शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून विद्यार्थी येत असतात. याठिकाणी देशातील एकमेव अनुवाद सुविधा केंद्र आहे. यामुळे देशभरातून साहित्यिक याठिकाणी अनुवादाचे काम करण्यासाठी येत असतात. रोड व्यवस्थित नसल्याने सर्वांची प्रचंड गैरसोय होत आहे.
विद्यमान कोकण आयुक्त जगदीश पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्मारकाला भेट दिल्यानंतर रोडचे काम करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून उत्तरप्रदेशमधील एका खासदाराचा ८० लाख रुपये निधी त्यासाठी वापरण्यात येणार आहे.
पवारांचा हेलिकॉप्टर दौरा : स्मारकाच्या दुसºया टप्प्याचे लोकार्पण २५ जानेवारी २०१४ मध्ये करण्यात आले. प्रमुख पाहुणे तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे हेलिकॉप्टर महामार्गाजवळ उतरविण्यात यावे व त्यांना रोडने स्मारकापर्यंत घेवून जावे म्हणजे त्यांना रोडची दुरवस्था लक्षात येईल अशी योजना तयार केली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने एका रात्रीत स्मारकाजवळील शेतात हेलिपॅड तयार करून रोडवरचे खड्डे दिसणार नाहीत याची काळजी घेतली.
कोकण आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांचा पाठपुरावा : विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी नुकतीच साने गुरुजी स्मारकास भेट दिली. स्मारकामधील काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त करून रोडचे काम लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. निधी उपलब्ध होत नसल्याने उत्तर प्रदेशमधील एका खासदाराचा ८० लाख रुपये निधी यासाठी मिळविण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे पावसाळ्यानंतरच रोडचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
१७ वर्षांपूर्वीचा रोड
वडघरजवळ १९९८ मध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ नोव्हेंबर २००० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा याठिकाणी जाण्यासाठी रोड बनविण्यात आला होता. तेव्हापासून महामार्ग ते स्मारकापर्यंत व आजूबाजूच्या वाडी- वस्त्यांवर जाण्यासाठी पक्का रोड तयार करण्यात आलेला नाही.