महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Published: June 28, 2017 03:34 AM2017-06-28T03:34:05+5:302017-06-28T03:34:05+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून

Pothole empire on the highway | महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्याच पावसामध्ये रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रोज वाहतूककोंडी होऊ लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, वाहतूककोंडीमुळे प्रवाशांसह वाहतूकदारांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
सायन-पनवेलप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ राज्यांशी हा महामार्ग जोडला जातो. महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रामध्ये ४८२ किलोमीटरचा समावेश आहे. हे काम करण्यासाठी शासनाने ११ हजार ७४७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा पूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. सद्यस्थितीमध्ये पनवेलपासून पुढे महामार्गाचे काम सुरू आहे; परंतु ठेकेदाराकडून अपेक्षित वेगाने कामे केली जात नाहीत. वाहतूक सुरळीत होईल, याचीही काळजी घेतली जात नाही. पहिल्याच पावसामध्ये आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण गावापासून तारा येथील युसुफ मेहरअली सेंटरपर्यंतच्या रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे मोटारसायकलचे वारंवार अपघात होऊ लागले आहेत. अपघातामुळे नियमितपणे वाहतूककोंडी होत असून, मुंबईकडे येणाऱ्या व येथून जाणाऱ्या प्रवाशांना एकाच ठिकाणी अडकून राहावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या विकासाचा महामार्ग होणार असल्याचे बोलले जात आहे. २०१९पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने जाहीर केला आहे; परंतु पहिल्याच टप्प्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यावर्षी पावसामध्ये पूर्ण महामार्ग खड्डेमय झाला असून, पुढील तीन महिने येथून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. शासनाने ठेकेदाराला सूचना देऊन खड्डे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत, याशिवाय महामार्गावर वाहतूककोंडी होणार नाही. अपघात होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्याची मागणीही होऊ लागली आहे. पावसाळ्यात महामार्गाचे काम धिम्या गतीने झाले तरी चालेल; पण खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Web Title: Pothole empire on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.