नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर एमएमआरडीएने दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग उभारला आहे. तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडले असून भुयारी मार्ग जलमय होऊ लागला आहे.सायन-पनवेल महामार्गाप्रमाणेच सर्वाधिक वाहतूक असलेला रस्ता म्हणून ठाणे-बेलापूरची ओळख आहे. या मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने २००७ मध्येच काँक्रीटीकरण केले आहे. यानंतरही वाहतूककोंडी होत असल्यामुळे एमएमआरडीएने घणसोली ते तळवली दरम्यान १४५१ मीटर लांबीचा, सविता केमिकलजवळ ५७६ मीटर लांबीचा व ‘लोकमत’ प्रेसजवळ ४८५ मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधला आहे. या तीनही प्रकल्पांवर १५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तीनही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले; परंतु तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडू लागले आहेत. भुयारी मार्गामध्ये पाणी साचू लागले आहे. खड्ड्यांमुळेअपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घणसोली उड्डाणपुलावर चार ते पाच मोठे खड्डे पडले आहेत. नवीन पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पहिल्याच वर्षी खड्डे पडले असल्यामुळे पुढील पावसाळ्यात पुलाची चाळण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर तीन महिन्यांतच पडले खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:15 AM