अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीकामोठे वसाहतीतील रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. आता तर ठिकठिकाणी खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोरजीच्या वाहिन्या टाकण्याकरिता अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून नागरिकांचीही गैरसोय होत आहे. सिडकोने इमारतीच्या बांधकामांना परवानगी देताना रस्त्यांचा विकास केला नव्हता. रहिवाशांनी वारंवार आवाज उठवल्यानंतर सिडकोने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी रस्ते विकसित केले. पनवेल-सायन महामार्ग ते मानसरोवर या दरम्यान मुख्य रस्ता आहे. याठिकाणी सिडकोने दुभाजक विकसित केले. त्यात पाम आणि इतर झाडे लावली असली तरी बॅनर्स आणि फलकांमुळे रस्त्यांच्या सौंदर्यात बाधा येत आहे. सेक्टर १६ मधील विघ्नहर्ता सोसायटीसमोरील रस्ता खोदण्यात आलेला आहे. या ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने रस्त्याच्या मधोमध छेद घेण्यात आला आहे. मात्र खड्डा न बुजविल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रिध्दी सिध्दी हेरिटेझ सेक्टर-१४ या ठिकाणी केबल टाकण्याकरिता रस्ता उखडण्यात आला होता. तो बुजविण्यात आला असला तरी उर्वरित डेब्रिज न उचलल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. सेक्टर ११ मधील स्वस्तिक प्लाझासमोरील चौक चेंबरकरिता खोदकाम करण्यात आले होते. त्या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर माती पसरली आहे. सेक्टर १६ येथे सुध्दा रस्त्यावर खोदकाम झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्मा पॅराडाईज सेक्टर २० इमारतीतील सांडपाणी वाहून नेण्याकरिता जोडणी करण्याचे काम सुरू आहे. याकरिता रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सेक्टर-१६ येथे हावरे निर्मितीसमोर पाइपलाइन टाकण्याकरिता मोठे खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनांना येण्या-जाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. कामोठे वसाहतीत विविध खाजगी मोबाइल कंपन्यांनी फोरजी केबल टाकण्यासाठी रस्त्याची वाट लावून टाकली आहे. याकरिता सिडकोकडे त्या कंपन्यांनी परवानगी सुध्दा घेतली आहे. मात्र जास्त अंतर केबल टाकली जाते त्या तुलनेत परवानगी कमी क्षेत्रफळाची घेतली जाते. सिडकोच्या परवाना विभागाच्या हातचा हा खेळ असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे.फोरजी, थ्रीजी, जल आणि मलनि:सारण वाहिन्या टाकण्याकरिता परवानगी घेतली असली तरी ते ओबडधोबड काम करतात. त्यांनी रस्त्यांना कमीत कमी डॅमेज करण्याकरिता सूचना दिल्या जातील, त्याचबरोबर कामोठे वसाहतीतील रस्ते सुस्थितीत आणण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.- विलास बनकर, कार्यकारी अभियंता, कामोठे नोड, सिडको
कामोठेतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे !
By admin | Published: March 23, 2016 2:29 AM