सायन-पनवेल महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; अपघातांची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:21 AM2020-08-12T00:21:04+5:302020-08-12T00:21:13+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वर्तविण्यात येत असून, या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे.
नवी मुंबई शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग हा कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईमध्ये येण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे रुंदीकरण करून ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधले आहेत, परंतु महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने, दरवर्षी या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. सीबीडी-बेलापूर ते वाशीदरम्यान अनेक ठिकाणी महामार्ग खडबडीत झाला असून, रस्त्यावर ठिकठिकाणी रेती पसरलेली आहे. महामार्गाच्या या दुरवस्थेमुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने, पावसाळ्यात या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे, परंतु नागरिकांची गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक बस आणि खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगरातून गावी जाणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत.
रेल्वे बंद असल्याने महामार्गावर ताण वाढला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेगही मंदावला असून, ठिकठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. महामार्गावरील शिरवणे फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्यावरून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अपघातांची शक्यता निर्माण
झाली असून, सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे
नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, अनेक ठिकाणचे रस्ते खडबडीत झाले आहेत.
सायन-पनवेल महामार्गाच्या शेजारून जुईनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाºया सर्व्हिस रस्त्याचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे, याकडे महापलिकेचे दुर्लक्ष झाले आहे.