देशाचा विचार करण्याची दूरदृष्टी नसणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता; शरद पवारांची मोदींवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 09:54 AM2023-12-17T09:54:09+5:302023-12-17T09:56:54+5:30

कळंबोली येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

Power in the hands of a person who has no vision to think about the country Sharad Pawar criticizes narendra Modi | देशाचा विचार करण्याची दूरदृष्टी नसणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता; शरद पवारांची मोदींवर टीका 

देशाचा विचार करण्याची दूरदृष्टी नसणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता; शरद पवारांची मोदींवर टीका 

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईतील कळंबोली येथे आयोजित सभेतून मोदी सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. "आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. आजच मी वर्तमानपत्रात वाचले तुम्ही ही कदाचित वाचले असेल, आज देशाचे प्रधानमंत्री सुरतला गेले; कशासाठी गेले ? देशातला सगळ्यात मोठा हिऱ्यांचा प्रकल्प आज त्याचे उद्घाटन सुरत मध्ये ते करत होते. तुम्हाला माहीत असेल नसेल, मुंबईमधील बीकेसी म्हणून जो भाग आहे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम आणि हिरे व्यवहार इथे करून हजारो लोकांना काम देण्याचा निर्णय आम्ही घेतला. तिथल्या लोकांना जमीन दिल्या आणि जमीन देताना फक्त एक रुपयाला तिथे जमीन दिल्या आणि हजारो लोकांना तिथे काम मिळाले. आनंद झाला मला कारण, लोकांना काम मिळालं पण, आज देशाचे प्रधानमंत्री इथे काय होतं याचा विचार करत नाही. इथे जे झाले ते सुरतला कसं नेता येईल याचा विचार करत आहेत आणि इथल्या पेक्षा मोठा प्रकल्प तिकडे कसा जाईल याची काळजी ते त्या ठिकाणी घेत आहेत. देशाचा विचार करण्याची दूरदृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

शरद पवार यांनी आपल्या भाषणा नवी मुंबईतील नयना प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "प्रकल्प आणि विकास याला लोकांचा विरोध नसतो पण, स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करून विकास ही जी संकल्पना पूर्ण करायची असेल तर ती गोष्ट आम्ही मान्य करणार नाही. मी स्थानिक लोकांना एवढी खात्री देऊ इच्छितो की, देशाचे पार्लमेंटचे अधिवेशन चालू आहे ते १० दिवसात संपेल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या नयना प्रकल्पासाठी तुमची जी मागणी आहे त्याची पूर्तता करायला जी काही आवश्यकता असेल त्यात तुमच्या खांद्याला खांदा लावून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्या बरोबर आहोत," असा विश्वास पवार यांनी उपस्थितांना दिला.

कळंबोलीतील या सभेत शरद पवार यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. "मला आठवतंय त्या काळात मी राज्यामध्ये राज्यमंत्रिपदाचे काम करत होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि सिडकोचा प्रकल्प हा करण्याबद्दलचा निर्णय झाला, नंतरच्या काळामध्ये माझ्याकडे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आली आणि ती आल्यानंतर या भागातल्या भूमी पुत्रांचे अनेक प्रश्न आम्हा लोकांच्या कानावर आले. या भागामध्ये त्या वेळेचे आमचे सहकारी डी. बी. पाटील, दत्ता पाटील, डी. एन. पाटील, अनेकांची नावे घेता येतील या सगळ्यांनी इथल्या भूमिपुत्रांचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्याला साथ आम्ही लोकांनी दिली आणि आज या ठिकाणी त्याचे उत्तर पाहायला मिळत आहे, पण मला आठवतंय की, सिडकोची उभारणी होण्याच्या काळामध्ये या भागामध्ये दत्ता पाटील असो, डी. बी. पाटील असो, अन्य सहकारी यांच्याबरोबर आम्ही लोक मैलमैंल या भागात फिरलो, बाधांवर फिरलो, इमारती नव्हत्या, भाताचं पीक होतं आणि सबंध शेतकरी उद्ध्वस्त होईल अशा प्रकारची भीती ही त्या ठिकाणी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा सत्ता माझ्याकडे आली आणि सत्ता आल्यानंतर पहिला निकाल हा घेतला की, एकंदर जर विकासासाठी या भागात जमीन सिडकोसाठी घेतलेली असेल त्यातली साडेबारा टक्के जमीन ही काढून त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये देऊन त्यांना दोन पैसे मिळतील अशा प्रकारचा निर्णय घेतला; त्याचा फायदा या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी केला," असं पवार म्हणाले.
 
 

Web Title: Power in the hands of a person who has no vision to think about the country Sharad Pawar criticizes narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.