नवी मुंबई : सानपाड्यामधील उद्यानामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीची छबी दिसली होती. पोलिसांनी परिसराची झाडाझडती घेऊन आरोपीला अटक केली आहे.खासगी शिकवणीवरून घरी चाललेल्या सात वर्षीय मुलीला आरोपीने पैशाचे आमिष दाखवून उद्यानात नेले होते. त्या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तेथून पळ काढला होता. या घटनेनंतर बदनामीच्या भीतीने पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. परंतु दक्ष नागरिकांमार्फत पोलिसांना हा प्रकार समजला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अभय काकड यांनी पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांना धीर देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण फूस लावून मुलीला उद्यानात घेऊन जाताना दिसून आला. सीसीटीव्ही व खबºयांमार्फत पोलीस त्याच्याविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर हवालदार अभय काकड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक जमीर नाईक, उपनिरीक्षक विशाल जाधव, गणेश पवार, दिलीप राठोड, रामदास सोनवणे व अजय पाटील आदींच्या पथकाने तुर्भे येथून सदर गुन्हेगाराला अटक केली आहे.प्रसाद सीताराम जुनघरे (२३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो तुर्भे गावचा राहणारा आहे. खारघर येथील एका गॅस कंपनीसाठी तो काम करतो. त्याच्याविरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने यापूर्वी तुर्भे परिसरातदेखील अशा प्रकारचा गुन्हा केल्याची शक्यता असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, सानपाड्यातील गुन्हा सीसीटीव्हीमुळे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 3:43 AM