जेएनपीटी २०३० पर्यंत होणार मेगा पोर्ट विकास; केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:01 AM2021-11-14T07:01:44+5:302021-11-14T07:02:00+5:30

मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनोवाल हे पहिल्यांदाच जेएनपीटी बंदराच्या भेटीवर आले होते.

PPP synergies can accelerate growth of India’s maritime sector, says Minister Sonowal | जेएनपीटी २०३० पर्यंत होणार मेगा पोर्ट विकास; केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे वक्तव्य

जेएनपीटी २०३० पर्यंत होणार मेगा पोर्ट विकास; केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे वक्तव्य

Next

उरण : विविध विकासकामांमध्ये प्रगती करून आणि बहुविध पायाभूत सुविधा विकसित करून देशाच्या बंदर आधारित औद्योगिक विकासाचे नेतृत्व करत जेएनपीटी २०३० पर्यंत एक मेगा पोर्ट म्हणून विकसित होईल. सार्वजनिक-खासगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे देशाच्या सागरी क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.

मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सोनोवाल हे पहिल्यांदाच जेएनपीटी बंदराच्या भेटीवर आले होते. भेटीदरम्यान त्यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची, बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीचीही माहिती घेतली तसेच सार्वजनिक-खासगी क्षेत्राच्या भागीदारीमुळे जेएनपीटी बंदराने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला व जेएनपीटीच्या प्रमुख भागीदारांशीही संवाद साधला.

सोनोवाल यांनी २१० कोटी खर्चाच्या करळ जंक्शन ते जेएनपीटी पोर्ट रोड काँक्रीटीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन केले तसेच जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझातील अत्याधुनिक सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कमांड सेंटरला भेट दिली. याशिवाय त्यांनी सागरी पुरवठा साखळीतील अविभाज्य भाग असलेल्या कंटेनर ट्रकचालकांशीही संवाद साधला. जीटीआय हाउसमधील टर्मिनल कामकाजाचा आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष जहाजावर जाऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर जेएनपीटीच्या बहु-उत्पादन सेझ आणि हिंद टर्मिनल सीएफएसला भेट दिली. खासगी बीएमसीटीपीएलने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा व दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराच्या प्रगतीचा आढावा घेतला. जेएनपीटी टाऊनशिपमध्ये उभारण्यात आलेल्या ३५० प्रति मिनिट निर्मितीच्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

जेएनपीटीने नुकतीच सुरू केलेली ‘ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा वाढवणे, बंदराची सद्य:स्थिती तसेच जेएनपीटीच्या इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसह ‘व्यवसाय सुलभीकरणा’साठी जेएनपीटीने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी मंत्र्यांना दिली. याप्रसंगी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, मुख्य वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे आदी उपस्थित होते.

Web Title: PPP synergies can accelerate growth of India’s maritime sector, says Minister Sonowal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.