नवी मुंबई: प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील दिव्यांग नागरिकांनी सिडकोविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी मागन्या मान्य न झाल्यामुळे दिव्यांग नागरिकांनी सिडकोभवनमध्येच रात्री तळ ठोकून आंदोलन केले.
दिव्यांग नागरिकांच्या स्टाॅलला 200 फुटेपर्यंत जागा वाढवून मिळावी. ज्या दिव्यांगांच्या स्टाॅलचे 60 वर्षाचे करारनामे झाले नाहीत त्यांचे करारनामे केले जावे. स्टाॅलचे भाडे कमी करावे या मागण्यांसाठी दिव्यांग नागरिकांनी सोमवारी दुपारी तीन वाजता आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत प्रशासनाने कोणताही तोडगा न काढल्यामुळे रात्री सिडकोभवनमध्येच आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. रात्रभर जवळपास 30 दिव्यांग सिडकोभवनमध्येच तळ ठोकून होते. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही. ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल यांनी दिला आहे. प्रशासनाने लवकर मागण्या मान्य कराव्या अन्यथा प्रहार स्टाईल तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.