अनंत पाटील
नवी मुंबई : नवी मुंबईतील नाका कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न झाले आहेत. त्यांच्यासाठी प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था सन २०११पासून कार्यरत असून, दैनंदिन रोजंदारीवर कामगारांसाठी काम करते. सौर ऊर्जेवर आधारित प्रकाशरथ या फिरत्या नेत्रालयाद्वारे शहरातील नाका कामगारांना मोफत चष्मा देऊन नेत्र सेवा नियमितपणे उपलब्ध करून देते.
रोज सकाळी ८ ते १० या वेळेत नवी मुंबईतील विविध नाक्यांवर नेत्र सेवा देण्यात येते. यामध्ये टेलिमेडिसीनचाही वापर होतो. डोळ्यांना आघात होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता तसेच डोळ्यांना आघात झाल्यास करायचे प्रथमोपचार याचे मार्गदर्शन केले जाते. गरजेनुसार शस्त्रक्रियाही केल्या जातात. गेल्या दोन वर्षांत प्रकाशरथाद्वारे पाच हजारांहून अधिक नाका कामगारांची नेत्रतपासणी करून हजारो कामगारांना मोफत चष्मावाटप करण्यात आले आहे, तसेच अंधत्व आलेल्या कामगारांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. प्रभात ट्रस्टद्वारे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रशांत थोरात यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली येथील समाजमंदिरामध्ये कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू केले आहे.
विविध कंपन्यांमध्ये कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते त्याच धर्तीवर या उपक्रमांतर्गत दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे बीपी, पल्स, ऑक्सिजनचे प्रमाण, शरीराचे तापमान, सामान्य परीक्षा, ब्लड शुगर टेस्ट, ईसीजी आणि ऑडिओमॅट्रीसारख्या मूलभूत आरोग्याच्या तपासण्या व औषध उपचार मोफत केले जातात. प्रतिबंधात्मक वार्षिक आरोग्य तपासणी करण्यास हे नाका कामगार असमर्थ आहेत त्यामुळे ट्रस्टद्वारे संचलित बाह्यरुग्ण विभागामध्ये ते मोफत औषधोपचार घेऊ शकतात. प्राथमिक आरोग्य तपासणीमध्ये हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा विविध गंभीर आजारांवर उपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा मानस वार्षिक आरोग्य तपासणी केंद्राच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आश्लेषा थोरात यांनी व्यक्त केला. याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्रही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रभात ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते मोहसीन जमादार यांनी दिली.
नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपावी n‘वाढदिवस तुमचा.. आनंद सर्वांचा…’ या उपक्रमांतर्गत वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नाका कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे आपला किंवा आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील लोकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभात ट्रस्टचे अध्यक्ष नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत थोरात यांनी केले.