कोकण विभागात ५४ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र; पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन
By कमलाकर कांबळे | Published: October 16, 2023 08:43 PM2023-10-16T20:43:01+5:302023-10-16T20:43:35+5:30
ग्रामीण भागातील युवक आणि युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
नवी मुंबई : ग्रामीण भागातील युवक आणि युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कोकण विभागात ५४ ठिकाणी अशी केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या केंद्रांचे उद्घाटन होणार असल्याचे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी सोमवारी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमासंबंधीचा आढावा घेतला. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेद्र सिंह, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) अजित साखरे, अपर जिल्हाधिकारी हनुमंत आरगुंडे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त स.पा.चाटे, उपायुक्त डी.डी.पवार आदी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यात ९ केंद्र, पालघर जिल्ह्यात १२, रायगड जिल्ह्यात १४, रत्नागिरी ११, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ठिकाणी एकूण ५४ ठिकाणी एकाच वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागातील कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार असल्याचे डॉ. कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.