ताबा सुटल्याने कारचा अपघात, सुरक्षारक्षकाचे थोडक्यात बचावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:52 AM2018-06-07T01:52:28+5:302018-06-07T01:52:28+5:30
चालकाचा ताबा सुटल्याने कार सोसायटीच्या भिंतीला धडकून अपघाताची घटना सीबीडी येथे घडली आहे. या दुर्घटनेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.
नवी मुंबई : चालकाचा ताबा सुटल्याने कार सोसायटीच्या भिंतीला धडकून अपघाताची घटना सीबीडी येथे घडली आहे. या दुर्घटनेत सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अपघातानंतर पळालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास सीबीडी सेक्टर ११ येथील हिलटन सेंटर या इमारतीच्या आवारात हा प्रकार घडला. सदर इमारत वाणिज्य वापरासाठी असून, त्यामध्ये विविध कंपन्यांची व व्यावसायिकांची कार्यालये आहेत. यामुळे त्याठिकाणी सतत नागरिकांची ये-जा सुरू असते. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास या सोसायटी आवारात उभ्या असलेल्या कार (एमएच ०९ ईयू २०८२)ने सोसायटीच्या भिंतीला जोराची धडक दिली. अपघाता वेळी कार चालवणाऱ्या तरुणाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे कारचा वेग वाढून ती तिथे उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना धडकली.
यानंतर ती सोसायटीची भिंत व फाटक तोडून दुसºया भिंतीवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये कारच्या पुढच्या भागाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर केवळ एअर बलून उघडल्याने कार चालकाचे प्राण वाचले आहेत. यामध्ये सोसायटीच्या सुरक्षारक्षकाचे देखील थोडक्यात प्राण वाचले आहेत, तर कारचालकाने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला आहे.
अपघाताची माहिती मिळताच इमारतीच्या सोसायटी पदाधिकाºयांनी घडलेल्या प्रकाराची माहिती सीबीडी पोलिसांना दिली. त्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत असले तरी सदर कार एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाची असल्याने कारवाईबाबत साशंकता व्यक्त होत आहे.