प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार - प्रशांत ठाकूर; सिडको अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 05:26 AM2018-09-05T05:26:09+5:302018-09-05T05:26:20+5:30
सिडकोची स्थापना झाल्यापासून ४८ वर्षांमध्ये प्रथमच स्थानिक भूमिपुत्रांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून, विमानतळासह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई : सिडकोची स्थापना झाल्यापासून ४८ वर्षांमध्ये प्रथमच स्थानिक भूमिपुत्रांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असून, विमानतळासह सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
सिडको भवनमध्ये मंगळवारी ठाकूर यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकाल्यानंतर कामकाजाविषयी भूमिका स्पष्ट केली. सिडकोचे कामकाज अधिक लोकाभिमुख करण्यावर लक्ष देणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न राहील. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून चांगले काम करण्यास प्राधान्य देणार आहे. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो व अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
सिडको कार्यक्षेत्रामधील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.
या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंदा म्हात्रे, सुभाष भोईर, पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महेश बालदी, महेंद्र घरत, नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते. सिडकोच्यावतीने उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, जे. टी. पाटील यांनीही नवीन अध्यक्षांचे स्वागत केले.