बाप्पाच्या मंडपापुढे नमाज अदा
By admin | Published: September 14, 2016 04:46 AM2016-09-14T04:46:42+5:302016-09-14T04:46:42+5:30
सर्वधर्म समभावनेचा संदेश देत कोपरखैरणे येथे गणेशोत्सव मंडळापुढे ईदचा नमाज पठण करण्यात आले. विभागात एकमेव मैदान त्याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे
नवी मुंबई : सर्वधर्म समभावनेचा संदेश देत कोपरखैरणे येथे गणेशोत्सव मंडळापुढे ईदचा नमाज पठण करण्यात आले. विभागात एकमेव मैदान त्याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे विभागातील मुस्लीम धर्मियांच्या नागरीकांची नमाज पठणात गैरसोयी होऊ नये, याकरिता ही संकल्पना राबवण्यात आली.
कोपरखैरणे सेक्टर १० परिसरात एकमेव मैदान असून, त्याठिकाणी सर्वधर्मियांचे कार्यक्रम होत असतात. या मैदानावर सध्या श्रीगणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे. सुमारे १९९५ पासून हे मैदान नवरात्री, गणेशोत्सवासाठी तसेच नमाज अदा करण्यासाठी वापरले जात आहे. यंदाही गणेशोत्सात काळातच ईद आल्यामुळे विभागातील मुस्लीम धर्मियांपुढे नमाज पठनासाठी जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. गणेशोत्सवानिमित्त त्याठिकाणी विविध मराठमोळे कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यामुळे नमाजासाठी मुस्लीम धर्मियांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यावर पर्याय म्हणून कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मुस्लीम धर्मियांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेतली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईक, मौलाना मोहम्मद जुलकरेमम शेख, अहमत फिरफिरे, अब्दुल खान यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार गणेशोत्सव मंडळाबाहेर ईदचे नमाज पठन करण्यात आले. तर कोपरखैरणे पोलीस व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्माच्या नागरीकांना सर्व धर्म समभावनेचा संदेश दिला. (प्रतिनिधी)