नवी मुंबई : ऐरोली विधानसभा क्षेत्रातील मान्सूनपूर्व नालेसफाई आणि इतर अत्यावश्यक कामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे तुंबलेले नाले, दुतर्फा भरून वाहणारी गटारे, मोडकळीस आलेले मॅनहोल, उखडलेले रस्ते असे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. विशेषत: गावे आणि झोपडपट्टी परिसरात मान्सूनपूर्व कामांचा केवळ सोपस्कार उरकल्याचे दिसून येते.
शहरवासीयांवर सध्या कोरोनाचे संकट आहे. यातच पावसाळा आल्याने प्रशासनाची तारेवरची कसरत होत आहे. अशातही प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांची वार्षिक प्रक्रिया पूर्ण करून टाकली. काही भागात नालेसफाईच्या कामांना सोयीस्करपणे बगल दिल्याचे दिसून येते. दिघा, ऐरोली आणि घणसोली परिसरात याचा प्रत्यय येतो. या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांतील गाळ उपसलेला नाही. गावांतील सांडपाणी वाहून नेणाºया छोट्या नाल्यांची अवस्था दयनीय असून नाल्यांचे कठडे तुटले आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे गायब आहेत. गावासारखीच अवस्था झोपडपट्ट्यांची आहे. नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने पावसाळ्यात साथीचे रोग बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी साधारण मे महिन्यात मान्सूनपूर्व कामांचे कोट्यवधींचे टेंडर काढले जाते. अंडरस्टँडिंग करून वाटप झालेल्या या कामाच्या दर्जावर नगरसेवकांचा वॉच असतो. परंतु या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. नगरसेवकांचा कालावधी संपल्याने टक्केवारीचे गणित विस्कटले आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या अधिकारात मान्सूनपूर्व कामांचे वाटप केले. परिणामी, दरवर्षी पुढेपुढे करणारे माजी नगरसेवक नाराज झाले. ही बाब कंत्राटदारांच्या पथ्यावर पडल्याने डेडलाइनच्या आत मान्सूनपूर्व कामे उरकली. यात कामांच्या दर्जाला सोयीस्कररीत्या फाटा देण्यात आल्याने पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला असला तरी ऐरोलीचे आमदार कार्यरत आहेत. ऐरोलीकरांनी गणेश नाईक यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तेसुद्धा फारसे जागरूक नसल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मान्सूनपूर्व कामांवर चांगलाच वॉच ठेवला होता. शहरात फेरफटका मारून त्यांनी या कामांची पाहणी केली. कंत्राटदारांना आवश्यक सूचना केल्या. ऐरोली मतदारसंघात मात्र हे चित्र पाहावयास मिळाले नाही. आमदार गणेश नाईक यांनी स्वत: या कामांचा एकदाही आढावा घेतला नाही. याअगोदर आमदार असलेले त्यांचे सुपुत्र संदीप नाईक हेसुद्धा फिरकले नसल्याचे रहिवासी सांगतात. कंत्राटदारांवर वचक नसल्याने कामांचा फज्जा उडाल्याचे रहिवासी सांगतात.पावसाळ्यात साथीच्या रोगांची भीतीच्पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने न झाल्याने पावसाळ्यात रहिवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.च्ऐन पावसाळ्यात ऐरोली विधानसभा क्षेत्रात तुटलेली गटारे, तुंबलेले नाले, ख•ेमय रस्ते, तुटलेल्या डीपी बॉक्स असे दयनीय चित्र पाहावयास मिळत आहे.च्अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने नागरिक भयभीत झाले आहेत. अशातच साथीच्या रोगांचे सकंट समोर उभे ठाकल्याने रहिवाशांत असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.