रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य; १.४८ लाख कोटींची तरतूद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:58 AM2018-02-02T05:58:01+5:302018-02-02T05:58:27+5:30
रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांची दुरूस्ती व देखरेख याकडे विशेष लक्ष पुरवले जाईल.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांची दुरूस्ती व देखरेख याकडे विशेष लक्ष पुरवले जाईल.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ट्रेनच्या प्रत्येक बोगीत सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि प्लॅटफॉर्मवरही त्यांची संख्या वाढवली जाईल. सर्व ट्रेन्समधे व्हाय फाय सुविधा असेल. सर्व नॅरोगेज लाइन्सचे ब्रॉडगेजमधे रूपांतर व रेल्वेव्दारा मालवाहतूक अधिक वेगागे करण्याची ग्वाही अर्थसंकल्पात आहे.
रेल्वेसाठी नवे काय?
ज्येष्ठ नागरिक व रूग्णांची गरज लक्षात घेत रोज २५ हजारांहून अधिक लोकांच्या वर्दळीच्या सर्व स्थानकांवर एस्कलेटर्स बसवण्यात येतील. एकूण ११ हजार ट्रेन्सच्या बोगीत व प्लॅटफॉर्म्सवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ३ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. सर्व शहरी रेल्वे स्थानकांवर साधारणत: ३ हजार एस्केलेटर्स व १ हजार लिफ्टस लावण्याचा संकल्प आहे.
कर्नाटकात लवकरच विधानसभेची निवडणूक आहे, ही बाब लक्षात घेता बंगळुरूत उपनगरी लोकल वाहतूक सेवेत १६0 किलोमीटर्स अंतराची भर घालण्यासाठी १७ हजार कोटींची तरतूद आहे. बुलेट ट्रेन्स व हायस्पीड ट्रेन्सचे प्रकल्प लक्षात घेता तरूणांना या नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी बडोद्यात रेल्वे इन्स्टिट्युट उभारली जाईल. या इन्स्टिट्युटमधे ३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्याचा पूर्ण खर्च रेल्वे करील.
36000
किलोमीटर्सचे भारतात नवे लोहमार्ग तयार होणार आहेत. १८ हजार किलोमीटर्स लोहमार्गांचे दुहेरीकरण (डबलिंग) व ४ हजार किलोमीटर्स लोहमार्गांचे त्रिपदरी व चौपदरीकरण करण्याचा संकल्प आहे.
4000
किलोमीटर्स देशात लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी ताब्यातल्या रिकाम्या जमिनींचा व्यापारी पद्धतीने वापर करण्याचे ठरवले आहे.
मुंबईतील रेल्वेच्या विस्तारासाठी
भरीव निधी
मुंबईच्या उपनगरी लोकल वाहतुकीत ९0 किलोमीटर्स अंतराचा विस्तार करण्यासाठी ११ हजार कोटींची तरतूद आहे. यात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार आहे. उपनगरीय रेल्वेचा १५० किलोमीटरने विस्तार केला जाणार आहे. यासाठी ४० हजार कोटींची तरतूद केली आहे. -