विसर्जनासाठी प्रशासन सज्ज
By admin | Published: September 15, 2016 02:39 AM2016-09-15T02:39:05+5:302016-09-15T02:39:05+5:30
गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे.
नवी मुंबई : गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
नवी मुंबई, पनवेल व उरणमधील ४१० सार्वजनिक व १६,३५७ घरगुती गणरायांना अनंत चतुर्दशीदिनी निरोप देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुणे, सातारा व इतर अनेक ठिकाणांवरून ढोल-ताशांची पथके मागविण्यात आली आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वेशासह, विविध देखाव्यांसह विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये २४ प्रमुख विसर्जन तलावांवर जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक तलावावर स्वतंत्र स्टेज तयार केले आहे. स्वयंसेवक, पाणबुडी, अग्निशमन दलाचे जवान व इतर सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध केली आहे. शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही गोंधळ होवू नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकामध्ये विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास चौथरा तयार केला आहे. विसर्जनादरम्यान शिवाजी चौकात इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व ठिकाणी वाहतुकीमध्ये आवश्यक तो बदल केला आहे. पनवेल, उरण तालुक्यांमध्येही तेथील शासकीय यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)