नवी मुंबई : कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २५ जून रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यादृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.कोकण, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनानेसुद्धा तयारी सुरू केली आहे. २४ मेपासून या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आतापर्यंत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात पालघर जिल्ह्यातील एका तक्रारीचा समावेश आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती जगदीश पाटील यांनी दिली. २५ जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार आहे.
निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:44 AM