निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:36 PM2019-03-15T23:36:19+5:302019-03-15T23:36:40+5:30

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार; मतदान केंद्रनिहाय माहिती जमवण्यास सुरुवात

Prepare the police machinery for the elections | निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

Next

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी पोलिसांनी चालवली आहे. त्याकरिता शहरातील सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पोलीस ठाणेनिहाय व बुथनिहाय माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय सभा देखील रंगू लागल्या आहेत. त्यानुसार निवडणूक कार्यकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. त्याकरिता गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना निवडणूक कार्यकाळासाठी हद्दपार केले जाणार आहे.

गत लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून डझनभर गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगार परिमंडळ दोनमधील पनवेल व लगतच्या परिसरातील होते. तर यंदा परिमंडळ एकमधून देखील हद्दपार होणाऱ्या गुन्हेगारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या सत्तांतरासाठी राजकीय पक्षांमधील चढाओढीमुळे उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. विजयश्री खेचून आणण्यासाठी उमेदवारांकडून साम दाम दंड भेद वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे. याच अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. त्याशिवाय संवेदनशील मतदान केंद्रे व इतर बाबींच्या खबरदारीसाठी बुथनिहाय व पोलीस ठाणेनिहाय माहिती मिळवण्याच्या कामात पोलिसांची यंत्रणा गुंतली आहे.

मागील काही वर्षात पोलिसांच्या कारवायांपासून वाचण्यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी राजकारण्यांचा आश्रय मिळवल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याद्वारे अनेक विभागात मंडळांच्या नावाखाली ‘दादा-भाई’ च्या टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या टिकवून ठेवण्यासाठी संबंधित राजकारण्यांकडून त्यांच्यावर जन्मदिनाचे कार्यक्रम तसेच पार्ट्यांच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडला जात आहे. याच टोळ्या निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचारकांवर अथवा मतदारांवर दहशत निर्माण करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. मात्र, विद्यमान पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या पारदर्शक भूमिकेमुळे यंदा राजकारण्यांच्या गळ्याचे ताईत बनलेल्या दादा-भार्इंनाही प्रतिबंधात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

शहरातील अनेक राजकीय पदाधिकारी व इतर व्यक्तींकडे परवाना असलेली शस्त्रे आहेत. निवडणूक काळात त्यांचाही गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही शस्त्रे ठरावीक कालावधीसाठी पोलिसांकडून ताब्यात घेतली जाणार आहेत. येत्या काही दिवसातच गुन्हेगारांविरोधातील प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबवण्याला सुरवात केली जाणार आहे. तर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींनाही प्रतिबंधात्मक नोटिसा पाठवल्या जाणार आहेत.

Web Title: Prepare the police machinery for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.