नवी मुंबई : दिव्यांचा सण असलेल्या दीपोत्सवात फटाक्यांची आतषबाजी, रंगीत रांगोळी, फराळ आणि नव्या कपड्यांनी नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत. दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारे लक्ष्मीपूजन बुधवारी होत असून यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. व्यावसायिकांनी या निमित्ताने विविध सवलतींचा ग्राहकांवर भडिमार केला असून बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होत आहे. घराघरात तसेच व्यावसायिक, दुकानदार, औद्योगिक वसाहतींमध्ये लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी झाली आहे. बाजारपेठेत शाडूमातीच्या लहान आकारातील आकर्षक मूर्ती दाखल झाल्या आहेत. साधारणत: ८० रु पयांपासून या मूर्तीची सुरुवात आहे. प्रामुख्याने व्यापाऱ्यांकडून मूर्तीला प्राधान्य दिले जाते. यासाठी भरीव व पोकळ या प्रकारात सराफ व्यावसायिकांकडून पूजा उपकरणांसह चांदीच्या तसेच चांदीचा वा सोन्याचा मुलामा असलेल्या लहान-मोठ्या आकारातील लक्ष्मीच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. यात महालक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी असे विविध प्रकारही आहेत. लक्ष्मीपूजनासाठी केरसुणीचे महत्त्व कायम आहे. केरसुणी विक्रेते आठ दिवसांपूर्वीच बाजारपेठेत दाखल झाले होते. केरसुणीच्या जोडीची ६० रुपयांना विक्र ी होत आहे. याशिवाय पूजेसाठी आवश्यक बत्तासे ९० रु पये, लाह्यांची ६० रु पये किलोने विक्र ी होत होती. याशिवाय उटणे, सुगंधी तेल, साबण,अत्तरालाही मागणी होती.व्यावसायिकांकडून या दिवसाचे सोने करून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट फोन, फर्निचर, मोबाइल, वस्त्रे आदी वस्तूंवर ३० ते ५० टक्के दराने आकर्षक सवलतींसह खास भेटवस्तूंचे नियोजन करण्यात आले आहे. सराफ व्यावसायिकांनी मजुरीवर सूटसह आकर्षक भेटवस्तूची आॅफर देऊ केल्याने महिलावर्गाने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत काही दागिन्यांची आगाऊ नोंद करून ठेवली आहे. काहींनी अगदी कमी किमतीत गुंतवणुकीच्या दृष्टीने घरकूल नोंदविण्यास प्राधान्य दिले आहे. खाजगी नोकरदारवर्गाला सलग दोन दिवस लागून सुट्या मिळाल्याने दीपावलीच्या दोन-तीन दिवसांच्या सुटीत पर्यटन स्थळाला भेट देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. (प्रतिनिधी)
तयारी लक्ष्मीपूजनाची...
By admin | Published: November 11, 2015 12:30 AM