किल्ल्यावर शिवसृष्टीचा जिवंत देखावा सादर
By admin | Published: December 26, 2016 06:13 AM2016-12-26T06:13:43+5:302016-12-26T06:13:43+5:30
कोकण क्रीडा मित्रमंडळ, मुरूड नगरपरिषद व संदीपभाऊ मित्रमंडळाच्या वतीने जागर पद्मदुर्गाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
नांदगाव/ मुरूड : कोकण क्रीडा मित्रमंडळ, मुरूड नगरपरिषद व संदीपभाऊ मित्रमंडळाच्या वतीने जागर पद्मदुर्गाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रत्यक्ष पद्मदुर्ग किल्ल्यावर जाऊन शिवसृष्टीचा जिवंत देखावा सादर करून या सर्वांनी पर्यटक व स्थानिक नागरिकांची वाहवा मिळवली. जागर पद्मदुर्गाच्या या कार्यक्रमात २५० लोकांनी सहभाग नोंदवून बहुतांशी लोकांनी शिवकालीन मावळ्यांचा वेष परिधान करून हातात भाले व ढाली घेऊन मुख्य दरवाजापाशी बसून पहारेकरी व अन्य वेष परिधान करून शिवकाळाची प्रचिती दिली.
यावेळी उपस्थित मंडळांच्या पदाधिकारी वर्गाचे स्वागत नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या वेळी नगरसेविका वंदना खोत, दीपक शिंदे, सीमा दांडेकर, चंद्रकांत मोकल, कोकण क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पद्मदुर्ग किल्ल्यावर प्रकाशस्वामी जंगम यांनी विधिवत मंत्रोच्चार करून वातावरणात जागृती आणली, तर संदीप वाघपंजे यांनी अलिबाग येथून ज्योत आणून ती किल्ल्यावर तेवत ठेवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. स्थानिक नागरिक व पर्यटकांसाठी शिवरायांच्या काळातील युद्धकलांचा नजराणा पेश करण्यात आला. तलवारबाजी, दांडपट्टा व विविध कलागुण दाखवण्यात आले.
शिवकाळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली. नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्र माची सुरु वात झाली होती. या कार्यक्र मातून शिवकाळात सागरी किल्ल्याचे महत्त्व पटवून देण्यात येऊन त्या वेळीही वेशभूषा, राहणीमान या गोष्टी सुद्धा देखाव्यामार्फत दाखवण्यात आल्या. हा कार्यक्रम लोकांना सहज पाहाता यावा, यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी मोफत बोटीची व्यवस्था केली होती. हा किल्ला समुद ्रकिनाऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याने समुद्राच्या मध्यभागी आहे. (वार्ताहर)