प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण 

By नामदेव मोरे | Published: March 9, 2024 04:43 PM2024-03-09T16:43:44+5:302024-03-09T16:45:07+5:30

देशभरातील महानगरपालिकांच्या प्रतिनिधींची उपस्थिती; नवी मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण.

presentation of cleanliness of navi mumbai at number one indore | प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण 

प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण 

नामदेव मोरे,नवी मुंबई : देशातील सर्वात स्वच्छ शहर असा नावलौकीक असलेल्या इंदोरमधील ‘अन्वेषण – उत्कृष्टतेचे केंद्र’या उपक्रमासाठी नवी मुंबई महानगर पालिकेला आमंत्रित करण्यात आले होते. देशभरातील महानगर पालिका व नगरपालिकांच्या प्रतिनिधींसमोर नवी मुंबईतील स्वच्छता उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या वतीने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर यांच्या माध्यमातून इंदौर शहरात आयोजित ‘अन्वेषण’ या ‘शहराच्या दृष्टीकोनातून संसाधने, नियोजन आणि वितरण’ विषयक उपक्रमाचे आयोजन केले होते. नवी मुंबई महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी नवी मुंबई महानगर पालिकेच्या उपक्रमांची माहिती दिली. महानगर पालिकेने राबविलेल्या फिश फेड, शाळांतील ड्राय वेस्ट बँक, रिसायकल बझार – रिसायकल मार्ट – ९२ थ्री आर सेंटर्स, स्क्रॅपनेस्ट यासारख्या उपक्रमांतून ‘थ्री आर’ ची प्रभावी अंमलबजावणी, प्लास्टिमॅन, ग्रीनसोल, आकांक्षी शौचालय यासारखे अभिनव उपक्रम – अशी अनेक उल्लेखनीय कामे नवी मुंबई महानगरपालिका करीत आहे. त्याचप्रमाणे लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत आहे. अशाप्रकारे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नवी मुंबईच्या वैशिष्टपूर्ण कामांची माहिती उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली.

यावेळेस देशातील विविध शहरांचे आयुक्त, सह आयुक्त,  मुख्याधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये देशातील स्वच्छ शहरांमध्ये प्रथम क्रमांकाचे मानांकन दोन शहरांना मिळाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेस तांत्रिकृदष्ट्या तृतीय अर्थात व्दितीय क्रमांकाचे मानांकन असून यावर्षी कचरामुक्त शहराच्या श्रेणीत सेव्हन स्टार मानांकन प्राप्त देशातील केवळ २ शहरांमध्ये नवी मुंबई हे एक शहर आहे. प्रत्येक वर्षी अभियानात स्वच्छतेचा आलेख वाढत असून नवी मुंबईतील प्रकल्प इतर महानगर पालिकांसाठी पथदर्शी ठरत आहेत.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या वतीने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर यांच्या माध्यमातून प्रा. श्रुती तिवारी यांच्या समन्वयानुसार  ‘अन्वेषण – उत्कृष्टतेचे केंद्र’ हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमात देशातील विविध शहरांमधून उपस्थित उच्च अधिका-यांसमोर नवी मुंबईतील स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या उल्लेखनीय कामांचे सादरीकरण करण्याचा बहुमान नवी मुंबईला मिळाला असून यामुळे स्वच्छता अभियानातील कामगिरी उंचाविण्यासाठी प्रशासन व शहरवासियांचे मनोबल वाढेल असा विश्वास मनपा कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: presentation of cleanliness of navi mumbai at number one indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.