महासभेत ३३४८ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:22 AM2018-03-27T01:22:40+5:302018-03-27T01:22:40+5:30
आरोग्य विभागच आयसीयूमध्ये गेला असून रूग्णालयात उपचारासाठी गेलेला रूग्ण सुखरूप परत येईल याची खात्री नसल्याची खंत व्यक्त केली.
नवी मुंबई : स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी ३३४८ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर सादर केला. शहराच्या सर्वंकष विकासाच्या योजना मांडताना आरोग्य विभागाच्या कामकाजावर टीका केली. आरोग्य विभागच आयसीयूमध्ये गेला असून रूग्णालयात उपचारासाठी गेलेला रूग्ण सुखरूप परत येईल याची खात्री नसल्याची खंत व्यक्त केली.
महापालिका आयुक्त रामास्वामी एन यांनी ३१५१ रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. स्थायी समितीमध्ये सविस्तर चर्चा होवून तब्बल १९७ कोटी रूपये वाढ करून अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सभापतींनी तो अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला. उत्पन्न वाढीसाठी विशेष लक्ष दिले पाहिजे. मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर, नगररचना शुल्क, हॉटेल परवाना शुल्क, अनधिकृत बांधकाम शुल्क, अग्निशमन विभाग, कार्यालयीन इमारती भाडे,पे अँड पार्क या धोरणातून उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशा सूचना केल्या. विकास योजना राबविताना आरोग्य सुविधा सक्षम करण्याची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये आरोग्य सेवा आयसीयूवर आहे. प्रथम संदर्भ रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्रांमध्ये योग्य उपचार मिळत नाहीत. आवश्यक साहित्य व मशीनरी नाही. पुरेसे डॉक्टर नाहीत. पालिका रूग्णालयामध्ये एखादा रूग्ण गेला तर तो
पुन्हा बरा होवून परत येईल याची खात्री राहिलेली नाही. लोकप्रतिनिधींनी वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने त्याकडे व्यवस्थित लक्ष दिलेले नाही. आरोग्य सेवेलाच सलाईन लावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मनपा क्षेत्रामध्ये एकात्मिक पद्धतीने पाणी निचरा सुधारणा योजना राबवावी, टीटीटी औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्ते,पदपथ बंधणे, आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे, गावठाण क्षेत्रामध्ये एकत्रित विकासकामे करणे. कंत्राटी कामगारांना थकबाकी देण्यात यावी.
सिडकोनिर्मित वसाहतीमध्ये विकासकामे करण्यात यावी. जल विद्युत प्रकल्प उभारण्यात यावा. विष्णुदास भावेच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारणे, स्मशानभूमीत धुराडे बसविणे, फोर्टी प्लस, एपीजे अब्दुल कलाम, मदर तेरेसा व सेवालाल भवन बांधण्यात यावे.
पादचारी पूल व इतर विकास कामे करण्यात यावी अशा सूचना सभापतींनी यावेळी केल्या आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या योजनांचा वास्तववादी अर्थसंकल्प सादर केला असून प्रशासनाने तरतूद केलेली सर्व कामे मार्गी लावावी अशी सूचनाही सभापतींनी केली.