दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: January 9, 2016 02:15 AM2016-01-09T02:15:11+5:302016-01-09T02:15:11+5:30

रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये ८२ जागांकरिता रिंगणात असलेल्या २४६

The prestige of veterans | दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये ८२ जागांकरिता रिंगणात असलेल्या २४६ उमदेवारांच्या यशापयशापेक्षा जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री व भाजपा नेते प्रकाश मेहता,शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप, शिवसेनेचे अ‍ॅड.राजू साबळे, शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले, भाजपा नेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते कृष्णा कोबनाक,शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंढे आदि प्रमुख राजकीय नेत्यांबरोबरच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
पोलादपूर नगरपंचायतीत भाजपाच्या हाती सत्तेच्या चाव्या राहणार असल्याचा दावा रायगडचे पालकमंत्री व भाजपा नेते प्रकाश मेहता यांनी केला असला तरी त्यांना पोलादपूरचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांचे अत्यंत कडवे आव्हान आहे. काँग्रेसचे प्रदेश चिटणीस महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप हेही दंड थोपटून प्रचारात उतरले असून प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा काँग्रेसजन करीत आहेत.
माणगाव नगरपंचायत निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांचे स्नेही असणारे माजी आमदार अशोक साबळे व त्यांचे चिरंजीव अ‍ॅड.राजीव साबळे हे आता शिवसेनेतून पक्के विरोधात ठाकले आहेत. तटकरे व साबळेंनी एकमेकांना जाहीर आव्हान देखील दिले आहे. सेना-भाजपा युतीचे कडवे आव्हान राष्ट्रवादीला आहे.
तळा नगरपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीस सेना-भाजपाचे आव्हान आहे. म्हसळा नगरपंचायत ‘राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त’करण्याचा चंग भाजपा नेते कृष्णा कोबनाक यांनी भाजपा-सेना-आरपीआय अशा युतीच्या माध्यमातून बांधला आहे. खालापूरमध्ये शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लक्ष घातले असल्याने,येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The prestige of veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.