शहरातील खड्डेमय रस्ते होणार सुस्थितीत - प्रवीण पोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:55 AM2017-09-11T06:55:13+5:302017-09-11T06:55:26+5:30
शहरातील बहुतांशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: ठाणे-बेलापूर रस्ता आणि शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग खड्डेमय झाले आहेत. सार्वजनिक राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सोबत रविवारी या रस्त्यांची पाहणी केली.
नवी मुंबई : शहरातील बहुतांशी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: ठाणे-बेलापूर रस्ता आणि शहरातून जाणारा सायन-पनवेल महामार्ग खड्डेमय झाले आहेत. सार्वजनिक राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सोबत रविवारी या रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांची दयनीय स्थिती पाहून चिंता व्यक्त करीत, पुढील दीड महिन्यांत रस्ते सुस्थितीत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच रस्त्यांच्या निकृष्ट कामाला जबाबदार असणाºया कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले.
शहरातील खराब रस्त्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. यावर्षी महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांचा पुरता फज्जा उडाला आहे. पावसाळ्याअगोदर आवश्यक असलेल्या रस्ते दुरुस्तींच्या कामाला फाटा देण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांची आणखीनच दयनीय अवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने खड्डे रस्त्यात की, खड्ड्यात रस्ते, अशी अवस्था निर्माण झाली आहे. गणेशोत्सव काळात खड्ड्यांत माती किंवा खडीचा भराव टाकून रस्त्यांची मलमपट्टी करण्यात आली.
सायन-पनवेल महामार्गासह ठाणे-बेलापूर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्याचबरोबर अंतर्गत रस्तेही पूर्णत: उखडले गेले आहेत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत.
गेल्या महिन्यात सायन-पनवेल महामार्गावरील उरण
फाटा उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर गेल्या आठवड्यात याच मार्गावर वाशीगाव येथे खड्ड्यात दुचाकी आपटून झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी संतोष शिंदे यांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच शहरातील रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.
दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या झालेल्या या दुरवस्थेबद्दल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. या वेळी त्यांनी ठाणे-बेलापूर मार्गासह सायन-पनवेल महामार्गाचाही दौरा केला.
दौºयात आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, वरिष्ठ अभियंता आर. टी. पाटील, उपअभियंत्या मंजुषा दळवी यांच्यासह भाजपाचे डॉ. राजेश पाटील, विक्रम पराजुली, काशिनाथ पाटील, रमेश शिंदे, सुरेश गायकवाड आदी सहभागी झाले होते.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दिवसाआड अपघात होत आहेत. याची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतली आहे. त्यानुसार एका महिन्यात रस्त्यांची योग्य पद्धतीने डागडुजी करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या दिवाळीपर्यंत शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर.