माता-बाल संगोपन केंद्राचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:26 AM2017-08-11T06:26:59+5:302017-08-11T06:27:13+5:30

कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे.

 Prevention of Mother Child Welfare Center | माता-बाल संगोपन केंद्राचा घोळ सुरूच

माता-बाल संगोपन केंद्राचा घोळ सुरूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे. त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसला आहे.
कोपरखैरणे सेक्टर २२ येथे महापालिकेचे माता-बाल संगोपन केंद्र आहे. या केंद्रात कोपरखैरणे, पावणे, महापे, घणसोली तसेच बोनकोडे या परिसरात महिला तपासणीसाठी व प्रसूतीसाठी येतात. परंतु नियमित डागडुजीअभावी केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाल्याने दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी हे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर विसंबून असलेल्या शेकडो रुग्णांना वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात फेºया माराव्या लागत आहे. विशेष म्हणजे २00८-२00९ मध्ये केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्यात आली होती. परंतु हे काम अत्यंत तकलादू ठरल्याने काही महिन्यातच इमारतीची पडझड सुरू झाली होती. मागील दोन वर्षांपासून या इमारतीचा वापर होत नसल्याने ती मोडकळीस आली आहे. उंदीर व घुशीने इमारतीच्या चारही बाजूच्या भिंती पोखरल्या आहेत. भिंतीला तडे गेले आहेत. छताला गळती लागली आहे. दरवाजे मोडकळीस आले आहेत. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. लोखंडी ग्रील चोरीला गेले आहेत. एकूणच ही इमारत पूर्णत: धोकादायक बनल्याने तिची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. परंतु महापालिकेच्या अभियंता विभागाकडून पुनर्बांधणीऐवजी दुरुस्तीचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी प्रकट केली आहे.

केंद्राची इमारत दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून इमारतीचा गैरवापर सुरू आहे. याठिकाणी दिवसा एक सुरक्षारक्षक नियुक्त केला आहे. परंतु रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा नसल्याने इमारतीच्या आवारात गर्दुल्ल्यांचा तळ दिसून येतो. त्यामुळे परिसरात घरफोडी व किरकोळ चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात भंगार टाकण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे.

सध्या केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत दुरुस्ती करणे योग्य होणार नाही. कारण यापूर्वी करण्यात आलेली दुरुस्ती कुचकामी ठरली आहे. त्यामुळे पुनर्बांधणी हा एकमेव पर्याय असून प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी.
- देविदास हांडे-पाटील,
नगरसेवक,
प्रभाग ४२

Web Title:  Prevention of Mother Child Welfare Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.