- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने चोख बंदोबस्त लावला आहे, तर मागील महिन्याभरात ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या असून, त्यापैकी १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. सोमवारी होणाºया विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळपासून थंडावल्या आहेत. त्यानुसार निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या दोन दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण हे चार विधानसभा क्षेत्र येतात. या चारही विधानसभा क्षेत्रात निर्भयपणे मतदानाची प्रक्रिया राबवली जावी, याकरिता पोलीस सज्ज झाले आहेत. त्याकरिता संपूर्ण आयुक्तालयात सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्याशिवाय इतर राखीव दलाच्या चार तुकड्या व एक हजार होमगार्ड नवी मुंबई पोलिसांच्या मदतीकरिता शहरात दाखल झाले आहेत. त्यानुसार विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडून चारही मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.
प्रचार थांबल्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना प्रलोभने दाखवणे, मद्यपार्टी अथवा इतर गैरप्रकाराची शक्यता असते. त्याला आळा घालण्यासाठी चारही मतदारसंघात भरारी व स्थिर पथके तैनात करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात होणार असल्याने रविवारी सकाळीच सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन पोहोचवल्या जाणार आहेत. त्याकरिता प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे आयुक्तालय कार्यक्षेत्रात चार स्ट्राँगरूम तयार करण्यात आले आहेत. ऐरोलीतील सरस्वती विद्यालय, नेरुळचे आगरी कोळी भवन, पनवेलची इंदुबाई वाजेकर शाळा व उरणची जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी हे स्ट्राँगरूम तयार करण्यात आले आहेत.
मागील दोन दिवसांपासून या केंद्रांना पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. मतदानानंतर मतमोजणीपर्यंत त्याच ठिकाणी ईव्हीएम मशिन ठेवल्या जाणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्वच स्ट्राँगरूममध्ये तसेच बाहेरच्या आवारात सीसीटीव्हीचे जाळे बसवण्यात आले आहे. तर निवडणूक अधिकारी व बंदोबस्तावरील पोलीस यांच्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना सदर परिसरात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
निवडणूक काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मतदारावर दहशत निर्माण केली जाऊ शकते. अथवा मतदारांना प्रलोभने दाखवून त्यांचे मतपरिवर्तन केले जाऊ शकते. याकरिता मद्याचा अथवा पैशाचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक घोषित झाल्यापासून मागील महिन्याभरात परिमंडळ एकचे उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १७ जणांना निवडणुकीच्या अनुषंगाने तडीपार करण्यात आले आहे. ज्यांच्याकडून गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा ३५७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
परिमंडळ-२ मध्ये ५०५ जणांवर कारवाई
परिमंडळ-२ चे उपआयुक्त अशोक दुघे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५०५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ज्यांच्यापासून गुन्हेगारी कृत्य घडू शकते, अशा ३०० जणांचा समावेश आहे. त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावून कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल, असे कृत्य करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या २०५ जणांनाही नोटीस बजावून कारवाई करण्यात आली आहे.
घणसोलीतून रोकड जप्त
मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी पैशाचा वापर होऊ नये, याकरिता निवडणूक विभागाच्या भरारी पथकामार्फत सापळे रचून कारवाया केल्या जात होत्या. त्यानुसार घणसोली येथून ११ लाख ७७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. याशिवाय मुख्य रस्ते, नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मद्यविक्रीलाही बंदी
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार संध्याकाळपासून सोमवारी रात्रीपर्यंत बार, मद्यविक्री केंद्र तसेच चायनीस सेंटर बंद राहणार आहेत. त्याशिवाय अवैधरीत्या दारूसाठ्याचाही पुरवठा होणार नाही याचीही खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार मागील महिन्याभरात अवैध दारूविक्रीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने परिमंडळ एक मध्ये उपआयुक्तांच्या विशेष पथकाने मागील महिन्याभरात ३० हून अधिक कारवाई करून ४० जणांना अटक करण्यात आली आहे. तर हेरॉइन, एमडी पावडर यासह सुमारे २०५ किलो गांजाही पकडण्यात आला आहे.