ज्वारीची भाकर झाली ‘गोड’ दरात १० ते २० रुपयांनी घसरण
By नामदेव मोरे | Published: April 15, 2024 06:44 PM2024-04-15T18:44:37+5:302024-04-15T18:45:01+5:30
गृहिणींना दिलासा : आवक वाढल्यामुळे दर घसरले
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये ज्वारीची आवक वाढू लागली असून दर घसरू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्वारी ३५ ते ७५ रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर २५ ते ५६ रुपयांवर आले आहेत. तीन महिन्यात १० ते २० रुपयांची घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
ज्वारीची भाकरी हे गरिबांचे अन्न समजले जात होते. परंतु, आरोग्यासाठी चपातीपेक्षा भाकरी लाभदायक असल्याचे समजल्यामुळे मुंबई, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्येही भाकरीला पसंती मिळू लागली आहे. हाॅटेलमध्येही ज्वारीची भाकरी मिळू लागली आहे. यामुळे गहू पेक्षा ज्वारीला जास्त दर मिळत आहे. गतवर्षी उत्पादन कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढले होते. २०२३ च्या अखेरीस व २०२४ च्या सुरुवातीला होलसेल मार्केटमध्ये ज्वारीला ३५ ते ७५ रुपये किलो एवढा दर मिळाला होता. किरकोळ मार्केटमध्येही चांगल्या प्रतीची ज्वारी ६५ ते ८५ रुपये किलो दराने विकली जात होती.
फेब्रुवारीपासून ज्वारीचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये २२० टन ज्वारीची आवक झाली आहे. सोलापूर परिसरातून ज्वारी विक्रीसाठी येत आहे. होलसेल मार्केटमध्ये २५ ते ५६ रुपये किलो भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्येही ज्वारी ४० ते ६० रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे. ज्वारीचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असली तरी सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव
महिना - दर
जानेवारी - ३५ ते ७५
फेब्रुवारी २७ ते ६५
मार्च २६ ते ६०
एप्रिल २५ ते ५६
राज्यातील ज्वारीचे दर
बाजार समिती - प्रतिकिलो दर
सोलापूर - ३३ ते ३५
धुळे २० ते ३८
जळगाव २७ ते ३४
सांगली ३१ ते ३४
नागपूर ३५ ते ३८
अमरावती २५ ते २८
पुणे ३८ ते ५०
बीड १६ ते ३९
जालना २० ते ३५
छत्रपती संभाजीनगर - १८ ते ३५
अमळनेर २० ते २३