वाटाण्यासह पालेभाज्यांचे दर येताहेत नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:18 PM2023-11-24T13:18:06+5:302023-11-24T13:18:29+5:30
टोमॅटोची तेजी कायम : गवारही खातेय भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : टोमॅटोसह गवारचे दर वाढत असताना दुसरीकडे वाटाणा व पालेभाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दरही काही प्रमाणात कमी झाले आहेत.
मुंबई बाजार समितीमध्ये गुरूवारी५३९ वाहनांमधून १५०८ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये वाटाण्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गत आठवड्यात ७० ते १०० रुपये दर मिळत होता. आता हेच दर प्रतिकिलो ३५ ते ४५ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एक आठवड्यात वाटाणा १५० ते १६० रुपयांवरून ५० ते ६० रुपये किलोवर आला आहे. पालेभाज्यांचे दरही कमी झाले आहेत.
कोथंबिर जुडी होलसेल मार्केटमध्ये ९ ते १२ रूपये व किरकोळ मार्केटमध्ये १० ते १५ रुपये किलो दराने विकली जात आहे. मेथी जुडीही बाजार समितीमध्ये ९ ते १२ व किरकोळ मार्केटमध्ये १० ते १५ रुपये किलो दराने विकली जात आहे. वांगी, कोबी, ढोबळी मिर्ची, फ्लॉवर, दुधी भोपळा यांचे दरही नियंत्रणात आहेत. टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. होलसेल मार्केटमध्ये १२ ते ३८ व किरकोळमध्ये ५० ते ६० रुपयांना विक्री होत आहे. गवारचे दरही तेजीत आहेत. गवार होलसेल मार्केटमध्ये ४० ते ६० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपये किलो दराने विकले जात आहेत.