कांद्यासह भाजीपाल्याचे दर नियंत्रणात, एपीएमसीमध्ये आवक वाढली : कोबी, टोमॅटो सामान्यांच्या आवाक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:37 AM2022-11-16T11:37:08+5:302022-11-16T11:37:33+5:30
vegetables : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत. टोमॅटो ३० रुपये व कोबीसह दुधी भोपळा ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.
बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी तब्बल ६०४ वाहनांमधून २,७६० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. आवक समाधानकारक झाली असल्यामुळे सर्वच वस्तूंचे दर कमी झाले आहेत. शेवगा शेंग व वाटाणा वगळता सर्वच भाज्यांचे दर शंभरीच्या आतमध्ये आले आहेत. कांदा व बटाट्याचे दरही नियंत्रणात आले असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये कांदा २० ते ३१ रुपये किलो दराने विकला जात होता. मंगळवारी हे दर १५ ते २६ रुपयांवर आले आहेत. बटाट्याचे दर १५ ते २५ वरून १४ ते २२ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ४० व बटाटा
३० रुपये किलो दराने विकला जात आहे.
कांदा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की, चाळीमधील कांदा शेतकऱ्यांनी विकायला काढला आहे. यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. एक हजार टनपेक्षा जास्त कांदा व बटाटा विक्रीसाठी येत असल्यामुळे दर नियंत्रणात आले आहेत.