डाळींचे कडाडलेले भाव पुढील दीड महिना कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:25 AM2019-05-11T06:25:18+5:302019-05-11T06:25:45+5:30
देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे.
नवी मुंबई - देशात सुरू असलेल्या दुष्काळाचा परिणाम कृषी व्यापारावर झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये डाळींसह कडधान्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. मुगडाळ व तुरडाळीच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. मान्सून कसा असेल यावर बाजारभाव ठरणार असून, किमान दीड महिनातरी मार्केटमध्ये तेजी कायम राहील, असे धान्य व्यापारी पोपटलाल भंडारी यांनी सांगितले.
मुंबई बाजार समितीमध्ये तीन महिन्यांपासून डाळी व कडधान्याची आवक कमी होत आहे. फेब्रुवारीमध्ये रोज सरासरी ८०० ते एक हजार टन आवक झाली. सद्यस्थितीत ७०० ते ८०० टन आवक होत असून, काही वेळा यापेक्षाही कमी माल विक्रीसाठी येत आहे. देशभर सुरू असलेल्या दुष्काळी स्थितीचा फटका डाळींच्या व्यापाराला बसला आहे.
यावर्षी नवीन पीक बाजारात आल्यानंतर तूर व इतर कडधान्याचे दर घसरले होते. यामुळे शासनाने आयातीवर निर्बंध टाकले होते, यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात चांगले दर मिळणे शक्य झाले. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये येणारा माल कमी झाल्याने भाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये ४८ ते ५० रुपये किलो दराने विकल्या जाणाºया मसूरचे दर ५० ते ५२ रुपये किलो झाले आहेत. तुरडाळीचे दर ६० ते ७५ रुपयांवरून ६२ ते ८२ रुपये, मुगडाळीचे दर ६८ ते ८३ रुपये किलोवरून ६८ ते ९० रुपये किलो एवढे झाले आहेत.
डाळी व कडधान्याचे दर जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती भंडारी यांनी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामधून व मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थानमधून माल विक्रीसाठी येत आहे. मालाची मोठ्या प्रमाणात आयात सद्यस्थितीमध्ये लगेच सुरू होण्याची काही शक्यता नाही.