चिन्ह वाटपाआधीच प्रचार संघर्ष समितीला पडणार महागात
By admin | Published: November 18, 2016 03:48 AM2016-11-18T03:48:40+5:302016-11-18T03:48:40+5:30
अलिबागमधील नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापसह काँग्रेस-भाजपा पुरस्कृत असणाऱ्या संघर्ष समितीने चिन्ह वाटपाआधीच
अलिबाग : अलिबागमधील नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापसह काँग्रेस-भाजपा पुरस्कृत असणाऱ्या संघर्ष समितीने चिन्ह वाटपाआधीच प्रचार केल्याने त्यांची चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी स्पष्ट केले. राज्याच्या निवडणूक आयुक्तांच्या या संकेतामुळे शेकाप, काँग्रेस आणि भाजपा समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकी संदर्भात सहारिया यांनी गुरुवारी अलिबाग येथे विभागीय आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्याप्रसंगी सहारिया बोलत होेते. अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीत शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत नाईक आणि नगरसेवकपदाचे उमेदवार अनिल चोपडा यांच्या उमेदवारीबाबत संघर्ष समितीकडून हरकत घेण्यात आली होती; परंतु निवडणूक अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या होत्या. त्याविरोधात अलिबागच्या जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अलिबाग नगरपरिषद वगळता उर्वरित आठ नगरपरिषदेतील निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले होते. अलिबाग नगरपालिकेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक चिन्हांचे वाटप १९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आले होते; परंतु असे असताना शेकापने कपबशी चिन्हासह प्रचाराचे बॅनर विविध ठिकाणी लावले, तसेच त्यांचे उमेदवार कपबशीचे चिन्हही गळ्यात, शर्टवर लावून प्रचार करीत होते. त्याचप्रमाणे काँग्रेस-भाजपा या संघर्ष समितीनेही शिटी, हॅट, नारळ अशा चिन्हांचा वापर करीत प्रचाराचे रान पेटवले आहे.
चिन्हाचे वाटप झालेले नसताना प्रचार कसा करू शकतात, त्याविरोधात आयोग तक्रारीची वाट बघणार का, सुमोटो कारवाई करणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निवडणूक आयुक्त सहारिया यांनी निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांना काहीच उत्तर देता आले नाही. सहारिया यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चिन्ह वाटपाआधीच प्रचार केल्याने मतदारांची दिशाभूल केल्याचाच प्रकार आहे. त्याविरोधात निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या या परखड भूमिकेमुळे शेकापसह, काँग्रेस-भाजपा यांच्या संघर्ष समितीला फटका बसणार असल्याचे बोलले जाते.