उमेदवारी ठरविताना आर्थिक निकषांना प्राधान्य

By admin | Published: May 3, 2017 06:18 AM2017-05-03T06:18:10+5:302017-05-03T06:18:10+5:30

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरविताना जनसंपर्क, सामाजिक कार्य यापेक्षा आर्थिक निकषांना प्राधान्य दिले जात

Prioritization of financial criteria while deciding the candidature | उमेदवारी ठरविताना आर्थिक निकषांना प्राधान्य

उमेदवारी ठरविताना आर्थिक निकषांना प्राधान्य

Next

वैभव गायकर / पनवेल
पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरविताना जनसंपर्क, सामाजिक कार्य यापेक्षा आर्थिक निकषांना प्राधान्य दिले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे उमेदवार ठरविताना त्याच्या कामाबरोबर कोण किती खर्च करणार याला जास्त महत्त्व दिले जावू लागले आहे. यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारे पालखीचे भोई ठरत आहेत.
राजकीय पक्षाचा विस्तार करण्यासाठी व तो जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणीक कार्यकर्त्यांची गरज असते. कार्यकर्ते निवडणूक असो किंवा नसो पक्षाची व नेत्याची भूमिका सदैव जनतेपर्यंत घेवून जाण्याचा प्रयत्न करत असतात. वर्षभर गणेशोत्सव, दहीहंडीपासून ते हळदीकुंकू समारंभापर्यंत सर्व कार्यक्रम राबविण्यात येतात. प्रभागातील एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा निधन झाले तर हेच कार्यकर्ते सगळ्यात अगोदर रूग्णालयात हजर असतात. २४ तास नागरिकांच्या मदतीला व नेत्यांच्या आदेशाचे पालन करण्यात घालविण्यात येतात. पण निवडणूक आली की प्रामाणिक कार्यकर्त्यांपेक्षा आर्थिक स्थिती कोणाची चांगली आहे हे पाहून उमेदवारी निश्चित करण्यात येत आहे. पनवेल महापालिका निवडणुकीमध्येही हीच स्थिती निर्माण होवू लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना व दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळाले नसल्याने आयत्या वेळी पक्षात घेवून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांसाठी चार ते पाच महिन्यांपासून अनेक प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी केली जात आहे. संभाव्य उमेदवारांशी चर्चा करताना निवडणुकीत किती खर्च करू शकणार असा प्रश्नही विचारला जावू लागला होता. यापूर्वी पनवेल नगरपालिका, खारघर ग्रामपंचायत व इतर अनेक निवडणुकांमध्ये काही उमेदवारांकडे १०० ते २०० कोटी रूपयांची मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले होते. ग्रामपंचायतीसाठी करोडो रूपयांचा खर्च झाल्याच्या चर्चा होत्या. आता महापालिका निवडणुकीसाठी भरमसाट खर्च होण्याची शक्यता गृहीत धरूनच श्रीमंतांनाच उमेदवारी देण्याकडे सर्वांचा कल आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ५ लाखांची खर्च मर्यादा ठरवून दिली आहे. परंतु काही राजकीय पक्षांनी ५० लाख रूपये खर्चाची तयारी असेल तरच उमेदवारी मागा अशा शब्दात सुनावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवारी ठरविताना उमेदवाराचे शिक्षण, त्याने आतापर्यंत केलेले सामाजिक काम, पक्ष वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत हे सर्व विषय गौण ठरत आहेत.

मतदारांना आमिष
महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांकडून प्रयत्न होवू शकतो. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतासाठी मोबदला देण्याबरोबर फ्रीज, इन्व्हर्टर ते दुचाकीचे आमिष दाखविल्याची चर्चा होती. खानावळ ही आता सामान्य गोष्ट झाली असून निवडणुकीमध्ये हे प्रकार थांबविण्याचे आव्हान निवडणूक विभागासमोर असणार आहे.

श्रीमंत उमेदवारांची परंपरा

पनवेल तालुक्यामध्ये खारघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काही वर्षांपूर्वी एका उमेदवाराने २०० कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली होती. राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून त्या उमेदवाराची चर्चा झाली होती. याशिवाय पनवेल नगरपालिका व इतर ग्रामपंचायतीमध्येही अनेक उमेदवारांची संपत्ती डोळे दिपविणारी होती. पहिल्यांदा महापालिका निवडणूक होत असल्याने श्रीमंत उमेदवारांची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Prioritization of financial criteria while deciding the candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.