नवी मुंबई : देशातील पहिली स्मार्ट सिटी नवी मुंबई बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. बेलापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआयला शासनाकडून मंजुरी मिळवून दिली. पुनर्बांधणीसाठी १०० टक्के सभासदांची परवानगी घेण्याची अट शिथिल करून ५१ टक्केवर आणली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती बेलापूरमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिली.
पायाभूत सुविधा व रोजगारवृद्धीसाठी काय केले?शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा केला. जलवाहतूक सुरू करण्यासाठीही पाठपुरावा केला. शासनस्तरावर विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. उद्योग टिकावे व रोजगारवृद्धी व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. एपीएमसीमधील बंद पडलेल्या मार्केटच्या वापर बदलास परवानगी मिळवून देऊन, ते पुन्हा सुरू केले. अनेक वर्षे वापर होत नसलेली बाजारपेठ सुरू करण्यात यश मिळविले.
पुनर्बांधणीच्या प्रश्नावर भूमिका काय?मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. २०१४ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून अडीच एफएसआयचा प्रश्न मार्गी लावला. पुनर्बांधणीसाठी इमारतीमधील १०० टक्के सभासदांची मंजुरी बंधनकारक होती. याविषयी पाठपुरावा करून ही मर्यादा ५१ टक्केवर आली आहे. शासनस्तरावर हा प्रश्न सोडविण्यात आला आहे. आता अनेक इमारतींमध्ये दोन गट असल्याने व इतर प्रश्नांमुळे पुनर्बांधणी रखडली आहे. आता नागरिकांनी एकत्र येऊन पुनर्बांधणीसाठी एकमत करणे आवश्यक आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर काय भूमिका?नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात पाठपुरावा केला. गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी सभागृहात भूमिका मांडली. गावठाणामधील घरांना प्रापर्टी कार्ड दिले. विस्तारित गावठाणामधील घरांचे सर्वेक्षणही सुरू केले होते. कुकशेतमधील प्रलंबित प्रश्न सोडविला. विस्तारित गावठाणासाठीचे प्रॉपर्टी कार्ड व इतर प्रश्नही येणाऱ्या काळात सोडविण्यात येतील.
पर्यटनवृद्धीसाठी काय भूमिका?मतदारसंघापासून जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. यामुळे बेलापूरसह नवी मुंबईही आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे. येथे जगभरातून पर्यटक यावेत, यासाठी पाठपुरावा केला. ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. सिडकोच्या माध्यमातून मरीना प्रकल्प राबविला जाणार आहे. शहरात भगवान बुद्ध यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठीही महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे.
शहरवासीयांच्या आरोग्याचे प्रश्न?महापालिकेच्या रुग्णालयांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. बेलापूरचे पालिका रुग्णालय पूर्णक्षमतेने सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेक रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. भविष्यात शहरात पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. प्रत्येक नोडमधील आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला.