मरावे परी किर्ती रुपे उरावे...! उरणच्या प्रितम यांनी अवयव दान करून घालून दिला माणुसकीचा नवा पायंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 06:38 PM2024-06-19T18:38:35+5:302024-06-19T18:39:50+5:30

उरण तालुक्यातील नागाव येथील प्रितेश राजेश पाटील (५०) हे व्यावसायिक म्हणून परिसरातील परिचित क्तीमत्व.

Pritam from Uran gave a new step to humanity by donating his organs  | मरावे परी किर्ती रुपे उरावे...! उरणच्या प्रितम यांनी अवयव दान करून घालून दिला माणुसकीचा नवा पायंडा 

मरावे परी किर्ती रुपे उरावे...! उरणच्या प्रितम यांनी अवयव दान करून घालून दिला माणुसकीचा नवा पायंडा 

उरण : अचानक ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यूला कवटाळणाऱ्या उरण- नागाव मधील एका ५० वर्षीय इसमाने डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी आदी शरीरातील अवयव दान करून "मरावे परी किर्ती रुपे उरावे "ही म्हण सार्थ ठरवत समाजाला माणुसकीचा नवा पायंडा घालून दिला आहे. 

उरण तालुक्यातील नागाव येथील प्रितेश राजेश पाटील (५०) हे व्यावसायिक म्हणून परिसरातील परिचित क्तीमत्व. व्यवसायाच्या निमित्ताने सामान खरेदीसाठी शनिवारी (१५) तुर्भे-नवीमुंबई येथे गेले होते. घरी परत आल्यानंतर थोडंसं अस्वस्थ वाटत असल्याने आराम करीत असल्याचे सांगत ते घरातील वरच्या मजल्यावर गेले होते. दरम्यान त्यांच्या पत्नी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. या दरम्यान पती-पत्नीमध्ये ट्रेनने परत उरण येत असुन स्टेशनवर उतरल्यावर मी फोन करेन.तेव्हा मला न्यायला या असा संवाद झाला. पत्नी स्टेशनवर उतरल्यावर फोन केला.मात्र बऱ्याच वेळा फोन करूनही पतीकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे त्यांनी घरच्यांना फोन करून पतींना नेण्यासाठी येण्यासाठी सांगावा दिला.घरच्यांनीही वरच्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता त्यांना प्रितम अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे दिसले.तातडीने उपचार मिळावेत म्हणून घरच्यांनी उरणमधील काही हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी प्रयत्न केले.मात्र उरणमध्ये उपचार मिळणे अशक्य असल्याचे ध्यानी येताच त्यांनी अपोलो हॉस्पिटल गाठले.मात्र तीन दिवसांच्या उपचारा दरम्यान प्रितम यांचा फक्त श्वासोच्छ्वासच सुरू होता.मात्र ब्रेन पुर्णपणे डेड झाला होता. दरम्यान कुटुंबियांनी तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केली. मात्र त्यातूनही काही एक हाती लागले नाही. 

त्यामुळे मृत्यू तर अटळ असल्याची बाब अधोरेखित झाली. याआधी कधी तरी प्रितम यांनीही मृत्यूनंतर शरीरातील अवयव दान करण्याची इच्छा कुटुंबातील सदस्यांबरोबर झालेल्या चर्चेत व्यक्त केली होती. हाच धागा पकडून प्रितम यांच्या कुटुंबीयांनी प्रितम यांच्या मृत्यूनंतर शरीरातील डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी अवयव दान करण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली. दरम्यान मंगळवारी (१८)  प्रितम यांचे उपचारा दरम्यान नवीमुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले. निधनानंतर प्रितम यांचे डोळे, फुफ्फुस, यकृत, हृ किडनी आदी दान करण्यात आले.दरम्यान योगायोग असा की गोव्यातील एका महिलेसाठी तातडीने यकृताची आवश्यकता होती. या महिलेच्या कामी तातडीने यकृत येणार आहे. तसेच दोन किडन्या दोन रुग्णांच्या उपयोगात येणार आहेत. या दोन्ही किडन्या ठाण्यातील इस्पितळात पाठविण्यात आल्या आहेत. 

फुफ्फुस गिरगावातील रिलायन्सच्या एचएन इस्पितळात पाठविण्यात आल्या आहेत. डोळ्यांचे दोन्ही कॉर्निया दोन रुग्णांच्या उपयोगात येणार आहेत. 

हृदय मात्र कमकुवत झाल्याने उपयोगात आणता आलेले नाही. मात्र दान केलेले अवयव सहा रुग्णांच्या उपयोगात येणार असल्याची माहिती प्रितमचे नातेवाईक काका पाटील यांनी दिली. दान करण्यात आलेले आणखी अवयव अज्ञात गरजू रुग्णांच्या कामी येणार आहेत. याचेही समाधान वाटत असल्याच्या भावना काका पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान अवयव दानाने " मरावे परि किर्ती रुपे उरावे" ही म्हण प्रितमने सार्थ ठरविली आहे. 

दरम्यान बुधवारी (१९) प्रितम यांच्यावर नागाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भार्गवी व विवाहित सुहानी या दोन्ही मुलींनी वडिलांच्या चितेला अग्नी दिला. परिसरातील बहुधा ही एकमेव घटना असावी. 
 

Web Title: Pritam from Uran gave a new step to humanity by donating his organs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.