शहरातील खासगी डॉक्टरांचे शरद पवारांना साकडे, कोरोनाच्या काळात हवे विमा कवच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 10:53 AM2020-10-19T10:53:46+5:302020-10-19T10:55:14+5:30
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोविड योद्धयाचे निधन झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला आहे. या विम्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी सुरुवातीपासूनच राज्यभरातील विविध संघटनांकडून होत आहे. (Sharad Pawar)
नवी मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोना होऊन शहीद झालेल्या डॉक्टरांना विम्याची रक्कम देण्याचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईसह राज्यभरातील डॉक्टरांनीशरद पवार यांची शुक्रवारी भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कोविड योद्धयाचे निधन झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचा विमा घोषित केला आहे. या विम्यात खासगी डॉक्टरांचाही समावेश करण्याची मागणी सुरुवातीपासूनच राज्यभरातील विविध संघटनांकडून होत आहे. अशातच राज्य सरकारने ऑगस्टमध्ये परिपत्रक काढून खासगी डॉक्टरांनाही हा विमा लागू होणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार, कोरोनामुळे राज्यभरात शहीद झालेल्या डॉक्टरांच्या नातेवाइकांनी मरणोत्तर विम्यासाठी अर्ज केले, परंतु प्राप्त झालेले अर्ज अधिकारी फेटाळत असल्याचा आरोप हिम्पाम संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सोमनाथ गोसावी यांनी सांगितले.
यामुळे राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असताना, तो नियंत्रणात करण्यासाठी खासगी डॉक्टर झटत होते. परिणामी, अनेक डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली असून, त्यात राज्यात १०० हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहीद डॉक्टरांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपले निवेदन दिले.
याप्रसंगी हिम्पामचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.सोमनाथ गोसावी, निमाचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनायक म्हात्रे, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.चंद्रकांत पाटील, डॉ.एम.आर. काटकर, डॉ.जितेंद्र पवार आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी डॉक्टरांच्या समस्या समजून घेऊन शासन स्तरावर त्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.