शाळांमधील खासगी परीक्षांवर बंदी
By admin | Published: February 9, 2017 04:54 AM2017-02-09T04:54:15+5:302017-02-09T04:54:15+5:30
शालेय विद्यार्थ्यांचा हसत-खेळत आनंददायी शिक्षण पद्धतीने अध्ययन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अवांतर, खासगी व नियमबाह्य असणाऱ्या
अरु णकुमार मेहत्रे , कळंबोली
शालेय विद्यार्थ्यांचा हसत-खेळत आनंददायी शिक्षण पद्धतीने अध्ययन करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अवांतर, खासगी व नियमबाह्य असणाऱ्या स्पर्धा परीक्षांवर आता बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक काढून सर्व शाळांना आदेश दिले आहेत.
प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा अध्ययन विकास साधण्यासाठी शाळांमध्ये विविध परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखती, निरीक्षणपद्धती असे विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य ओळखण्यासाठी अनेक निकष शिक्षक वापरतात. यातच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणणे हे एक शासनासमोर आव्हान आहे, असे असले तरी विद्यार्थ्यांना कायम शिक्षणपद्धतीत पाठ्यपुस्तक व अभ्यासक्र मा व्यतिरिक्त इतर अवांतर परीक्षेचा ताण येत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. विविध खासगी संस्थांमार्फत प्रज्ञाशोध घेण्याच्या नावाखाली परीक्षा घेतल्या जातात. पालक आणि काहीवेळा शाळा मुलांना अशा परीक्षांना बसायला लावतात. याचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. या अवांतर खासगी परीक्षांसाठी लागणारी फीसुद्धा बऱ्याच पालकांना परवडणारी नसते. पालकांच्या खिशाला कात्री लागण्याची वेळ येते. रोजच्या शिक्षण पद्धतीचा विचार करता आनंददायी शिक्षण पद्धती कायम राहावी व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण पद्धतीचा ताण निर्माण होऊ नये यासाठी खासगी तसेच नियमबाह्य स्वरूपाच्या शिक्षणपद्धतीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.