खासगी शाळांचे ‘पैशासाठी कायपण’ धोरण; शिशू वर्गाच्या ऑनलाइन शिक्षणातही गणवेशाची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 11:33 PM2021-03-24T23:33:07+5:302021-03-24T23:33:37+5:30
शिक्षण विभागाचे मौन : यंदा प्रथमच एकाच शाळेत वरच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ५०० ते १००० रुपये फॉर्म शुल्क आकारले जात आहेत.
नवी मुंबई : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्रत्यक्षात शाळांची घंटा वाजली नाही. यामुळे शुल्काव्यतिरिक्त कमाईचे मार्ग बंद झाल्याने शाळांनीऑनलाइनशिक्षणात गणवेश सक्तीचा केला आहे. त्यासाठी पालकांकडून ३ ते ५ हजार रुपये उकळले जात आहेत. यानंतरही शाळांच्या मनमानी कारभाराबाबत शिक्षण विभाग हात आखडता घेत आहे.
शहरात सीबीएससी, आयसीएससी बोर्डाच्या शाळांवर पालिकेचा अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. शिशू वर्ग व प्राथमिक वर्गासाठीदेखील ऑनलाइन शाळा भरवून लाखो शुल्क आकारले जात आहे. अनेक पालकांना हेच शुल्क डोईजड झालेले असतानाच शाळांनी वेगवेगळ्या मार्गाने पालकांची आर्थिक पिळवणूक चालवली आहे. त्याकरिता यंदाच्या शुल्कात गणवेश शुल्काची भर टाकली आहे. प्राथमिक वर्गांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही शाळेचाच गणवेश घालायचा अशी सक्ती आहे. मात्र, आठवड्यातून तीन दिवस भरणाऱ्या ऑनलाइन वर्गासाठी गणवेशाची सक्ती का, असा प्रश्न पालकांना पडला आहे. या गणवेशासाठी ३ ते ५ हजार रुपये आकारले जात असून, त्यात पिटीच्या गणवेशाचाही समावेश आहे, तर यंदा प्रथमच एकाच शाळेत वरच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ५०० ते १००० रुपये फॉर्म शुल्क आकारले जात आहेत.
कारवाई होत नसल्याची खंत
एखाद्या पालकाने याविरोधात आवाज उठविल्यास त्यांना इतरत्र प्रवेश घेण्याचा धमकीवजा इशारा दिला जात आहे. त्यामुळे पालकांची गळचेपी होत आहे; परंतु शहरातील बहुतांश खासगी शाळांमध्ये पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू असतानाही शिक्षण विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेतील एका अधिकाऱ्याची अनेक वर्षांपासून कॉन्व्हेंट शाळांवर कृपादृष्टी असल्याा आरोप होत आहेत. त्यामुळे मनमानी करणाऱ्या शाळांविरोधात पालकांनी आवाज उठवूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.