नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील फिडर पिलर, सबस्टेशनची दुरवस्था झाली आहे. उघड्या बॉक्समुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बाजार समिती प्रशासनाने याविषयी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून तत्काळ दुरुस्तीची कामे करण्याची मागणी केली आहे.
बाजार समितीच्या धान्य, मसाला, कांदा-बटाटा, फळ व भाजी मार्केटमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी सबस्टेशन, फिडर पिलर उभारण्यात आले आहेत. यासाठी बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिली आहे; परंतु अनेक वर्षांपासून येथील फिडर पिलर व सबस्टेशन इमारतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. फिडर पिलरची झाकणे गायब झाली आहेत. या ठिकाणी विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सबस्टेशनच्या इमारतीचे दरवाजे तुटल्यामुळे फिरस्ते कामगार या ठिकाणी मुक्काम करत आहेत. त्यांनाही विजेचा धक्का लागण्याची शक्यता आहे. विद्युतविषयी कामे करण्याची मागणी व्यापारी व कामगारांनीही केली होती.
येथील विद्युतविषयी कामे करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. यामुळे बाजार समिती प्रशासनाने सर्व फिडर पिलर, सबस्टेशन व इतर दुरवस्थेचे छायाचित्र काढून ते महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांना दाखविले आहेत. सचिव अनिल चव्हाण यांनीही याविषयी संबंधितांना पत्र देऊन तत्काळ दुरुस्तीची कामे केली नाहीत तर गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी बाजार समितीला भेट देऊन पाचही मार्केटमधील परिस्थितीची पाहणी केली आहे. लवकरात लवकर दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
बाजार समितीमधील फिडर पिलर व इतर कामे करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. अधीक्षक अभियंत्यांनी पाचही मार्केटची पाहणी केली असून, लवकरच दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत. - व्ही. बी. बिरादार, अधीक्षक अभियंता, एपीएमसी