पामबीचवर कबुतरांमुळे अपघाताची शक्यता; मोटारसायकलस्वारांची सुरक्षा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:55 PM2019-10-29T23:55:49+5:302019-10-29T23:57:19+5:30
पुलावर धान्य न टाकण्याचे आवाहन
नवी मुंबई : पामबीच रोडवर नेरूळ व सानपाडामधील पुलाच्या कठड्यावर नागरिक पक्ष्यांसाठी धान्य ठेवू लागले आहेत. यामुळे येथे कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. येथे धान्य टाकू नये याविषयी जनजागृती करण्याची मागणीही केली जात आहे.
नवी मुंबईमधील महत्त्वाच्या रोडमध्ये पामबीच रोडचाही समावेश आहे. सायन - पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सिडकोने ९ किलोमीटरचा हा रस्ता बनविला आहे. या रोडवर पादचाऱ्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहने वेगाने असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात. काही महिन्यांपासून वाशीकडे जाणाºया मार्गिकेवर सारसोळेच्या पुढील पुलावर नागरिक पक्ष्यांसाठी धान्य ठेवू लागले आहेत. यामुळे येथे कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेकडो कबुतरे पहाटेपासून सायंकाळपर्यंत येथे असतात. अचानक शेकडो कबुतरे रोडवर आल्यामुळे वाहनचालकांचा तोल जाऊ लागला आहे. दुचाकीस्वारांना कबुतरे धडकल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पामबीच रोडवर पक्ष्यांसाठी धान्य टाकण्यास नागरिकांना मनाई करावी. वाहतूक पोलीस व महानगरपालिकेने याविषयी जनजागृती करावी. पुलाच्या दोन्ही बाजूंना सूचना फलक लावण्यात यावेत अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. पामबीच रोडऐवजी सर्व्हिस रोडवर किंवा इतर ठिकाणी पक्ष्यांना धान्य टाकावे, असे आवाहनही दक्ष नागरिकांनी केले आहे.
पामबीच रोडवर अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सारसोळे व सानपाडामधील पुलावर पक्षांसाठी धान्य ठेवल्यामुळे कबुतरांची संख्या वाढली असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पामबीचऐवजी सर्व्हिस रोड किंवा इतर ठिकाणी पक्ष्यांना धान्य टाकण्यात यावे. प्रशासनानेही याविषयी जनजागृती करावी. - निशांत भगत, युवा नेते भाजप