नवी मुंबई : शहरात धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस सुरू होताच तीन दिवसांमध्ये तब्बल १९ वृक्ष कोसळले आहेत. पावसाळ्यामध्ये रोडवर वृक्ष कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये उंच वाढलेल्या व दोन ते तीन दशकांपूर्वी लागवड केलेले वृक्ष कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दहा ठिकाणी वृक्ष कोसळले. सर्वाधिक सहा घटना नेरुळ परिसरामधील होत्या. तीन दिवसांमध्ये वृक्ष कोसळण्याचा आकडा १८ वर गेला आहे. रोडवर पडलेल्या वृक्षामुळे वाहतूककोंडी झाली होती. अग्निशमन दल व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ रोडवरील वृक्षाच्या फांद्या हटविल्या. अद्याप मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुटला नसताना एवढ्या घटना घडल्या असतील तर पुढील तीन महिन्यात १०० पेक्षा जास्त वृक्ष कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण करून अतिधोकादायक असलेले वृक्ष हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, अन्यथा वृक्ष पादचाऱ्यांवर किंवा वाहनांवर पडून गंभीर अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.