नवी मुंबई :सिडकोच्या कार्यक्षेत्रातील अंदाजे साडेआठ ते नऊ हजारांहून अधिक हौसिंग सोसायट्या अर्थात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची विविध कामांसाठी येणाऱ्या अडचणींची कटकट आता लवकरच मिटणार आहे. नवी मुंबई शहराचा सध्याचा वाढता विकास आणि नैना क्षेत्रात येणारे विकास प्रकल्प पाहता नगरविकास विभागाने सिडकोतील सहकारी संस्था विभागासाठी वाढीव अधिकारी दिले आहेत. यामुळे गृहनिर्माण संस्थांची स्थापनेपासून ते डिम्ड कन्व्हेन्स अर्थात मानीव हस्तांतरणापर्यंतची विविध कामे करता येणे सोपे होणार आहे.
नगरविकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी खास सिडकोच्या सहकारी संस्था विभागासाठी सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम दिली आहे. सध्या सिडकाेच्या कार्यक्षेत्रातील नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिकेसह उलवे, द्रोणागिरी, तळोजासह नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांची कामे सुरू आहेत. स्वत: सिडकोही पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ९५ हजार घरांचे बांधकाम करत आहे. यामुळे सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. त्यादृष्टीने सिडकोच्या मागणीनुसार उच्चस्तरीय समितीने १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत या वाढीव सात अधिकाऱ्यांच्या पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे.
ही कामे करता येणे सोपे होणारसहनिबंधक सहकारी संस्था, सिडको कार्यालयामार्फत सध्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि नियम १९६१ नुसार काम चालते. यात गृहनिर्माण सहकारी संस्थांची नोंदणी, उपविधी तयार करणे, त्यांची दुरुस्ती, सभासद नोंदणी, थकबाकीदारांकडून वसुली करणे, दफ्तर तपासणी, सभासदांचे अपिलावर सुनावणी घेणे यासह विविध कामे चालतात. मात्र, सिडकाे कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांची संख्या लक्षात घेता सिडकोच्या सहनिबंधक कार्यालयातील विद्यमान कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. परिणामी शहरातील गृहनिर्माण संस्थांची कामे उशिराने होऊन कटकटीत वाढ होत होती. परंतु, आता सात अधिकारी वाढल्याने शहरातील अंदाजे साडेआठ ते नऊ हजार गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन पदनिर्मितीस मंजुरी१ सहनिबंधक सहकारी संस्था, १ उपनिबंधक सहकारी संस्था, १ सहायक निबंधक सहकारी संस्था, २ सहकार अधिकारी श्रेणी-१ आणि २ सहकार अधिकारी श्रेणी-२ असे सात वाढीव अधिकारी आता सिडकोच्या सहकार संस्था कार्यालयाला मिळणार आहे.
पुनर्विकासाला मिळणार चालनासध्या नवी मुंबईत पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, पनवेल विभागात काही ठिकाणी सिडकोने बांधलेल्या जुन्या वसाहतींचा पुनर्विकासाची कामे सुरू झालेली आहेत. ताे करताना सोसायटीतील सभासदांची संमतीपासून अनेक कामे सिडकोतील सहकारी संस्था विभागाशी निगडीत आहेत. आता वाढीव सात अधिकारी मिळाल्याने पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि विकासकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय शहरातील पुनर्विकासाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.
खरे तर सहकार निंबधक हे शासनाच्या अधिकारात असतात. परंतु, सिडकोच्या मागणीनुसार तत्कालिन शासनाने सिडकोस सहकार विभाग सुरू करण्यास परवानगी दिली. ती दिली नसती तर सिडकोचा डोलारा कोसळला असता. सध्या सिडकोच्या नवी मुंबई आणि नवीन पनवेल कार्यक्षेत्रात साडेआठ ते नऊ हजार हौसिंग सोसायट्या आहेत. इतक्या मोठ्याप्रमाणातील सोसायट्यांचा कारभार सिडकोतील विद्यमान सहकार विभागातील अधिकार्यांना शक्य होत नाही. आता नव्याने सात अधिकारी आल्यावर त्यांच्यावरील भार हलका होण्यास मदत होईल.ए. के. भट्टाचार्य, नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लि.