वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील कोंडीचा प्रश्न कायम, महापालिका हतबल, शहरवासीयांची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:32 AM2020-10-28T00:32:26+5:302020-10-28T00:32:49+5:30
Navi Mumbai News : नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे.
नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावारूपाला येणाऱ्या नवी मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध झाल्याने विविध प्रांतातील नोकरदारांचा या शहराकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे.
सुनियोजित शहरातील रस्ते, उद्याने व इतर अत्यावश्यक सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शहराची उभारणी करताना वाहनतळाचे नियोजन करण्याचे राहून गेले. त्याचा त्रास आता शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. कारण उपलब्ध रस्ते आणि वाहनतळाच्या जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या शहरवासीयांना भेटसावत आहे. या समस्येवर मात करणे महापालिका प्रशासनाला अद्याप तरी फारसे यश आलेले नाही.
सिडकोने सुनियोजित असे नवी मुंबई शहर उभारले. वेगवेगळ्या नोडसमध्ये शहराची आखणी करण्यात आली. शहराचे नियोजन करताना संबंधित नोडसमधील वीस वर्षांनंतरची लोकसंख्या गृहित धरून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, परंतु कालांतराने सिडकोचे हे नियोजत पुरते फसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील वाहनांची संख्याही वाढली. त्यामुळे रस्ते आणि पार्किंगच्या सुविधांचा पुरता बोजवरा उडाला आहे.
विशेषत: वसाहतीअंतर्गच्या अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडीची कायमस्वरूपी समस्या भेडसावत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेकडून विविध योजना तयार करण्यात आल्या.
गृहनिर्माण सोसायटीतील वाहनधारकांनी आपली वाहने सोसायटीच्या आवारातच उभी करण्याचे फर्मान सोडण्यात आले. वसाहतीअंतर्गत रस्त्यावर वाहने पार्क करण्यास मज्जाव करण्यात आला. सम-विषम पार्किंगचा पर्यायही देण्यात आला. हे आदेश न जुमानणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईचा बडगाही उगारण्यात आला, परंतु वाहतूककोंडीची समस्या मात्र जैसे थे राहिली. आजतागायत ही समस्या कायम असून, भविष्यात ती अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एपीएमसीची वाहने वसाहतीत
तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाला कृषिमालाची शेकडो ट्रक व इतर वाहने येतात. मार्केटमध्ये रिकामी केल्यानंतर ही वाहने जागा मिळेल, तेथे पार्क केली जातात. मार्केट परिसरातच भव्य ट्रक टर्मिनल असतानाही अनेक वाहनधारक वसाहतीअंतर्गच्या छोट्या रस्त्यांवर आपले ट्रक आणि टेम्पो उभे करतात.
खासगी वाहनांना पदपथ आंदण
खासगी बसेस, रिक्षा, टेम्पो, तसेच टुरिस्टच्या वाहनांना शहरातील रस्ते व पदपथ आंदण दिल्यासारखी परिस्थती आहे. शहरात ठिकठिकाणी खासगी बसेस व मालवाहू टेम्पोच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. वाहतूक विभागाचे या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
दुतर्फा पार्किंगचा फटका
प्रमुख रस्त्यांसह दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी निमुळते होत असल्याने वाहतूककोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. विशेषत: संबंधित विभागातील विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
वाहतूक पोलिसांची तारांबळ
नोकरी-व्यवसायानिमित्त शेजारच्या शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांचा ताणही नवी मुंबईतील उपलब्ध रस्ते आणि वाहनताळाच्या अपुऱ्या सुविधांवर पडत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचे नियमन करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडताना दिसत आहे.