- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको विकसित नोडमधील कचरा निर्मूलनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दैनंदिन कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची असली, तरी सध्या हे काम सिडकोच्या माध्यमातून केले जात आहे. ही सेवा हस्तांतरित करून घ्यावी, यासाठी सिडकोकडून तीन वेळा महापालिकेला मुदत देण्यात आली. त्यानंतरही महापालिकेकडून या संदर्भात स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली नाही. त्यामुळे येत्या काळात हा प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.दीड वर्षापूर्वी पनवेल महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर, वर्षभरापूर्वी सार्वत्रिक निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाला. या कालावधीत सिडकोने टप्प्याटप्प्याने आपल्याकडील सेवा महापालिकेकडे वर्ग केल्या, परंतु कचरा निर्मूलनाचा प्रश्न मात्र जैसे थे आहे. सध्या खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आणि तळोजा या नोडमधील कचरा सिडकोच्या ठेकेदारांमार्फत उचलला जातो. ही सेवा महापालिकेने हस्तांतरित करून घ्यावी, यासाठी सिडकोचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी महापालिकेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली, परंतु महापालिकेकडे याबाबची स्वतंत्र यंत्रणाच नसल्याने हा प्रश्न जैसे थे राहिला आहे.कचरा निर्मूलनाच्या हस्तांतरणासाठी सिडकोने महापालिकेला दुसºयांदा दिलेली मुदत ३१ जानेवारी रोजी संपुष्टात आल्याने शहरात पुन्हा कचºयाचा प्रश्न निर्माण झाला होता. यातच सध्या शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विनंतीवरून सिडकोने ही मुदत आता १५ मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्यात स्वत:ची यंत्रणा उभारून कचरा निर्मूलनाचे काम हस्तांतरित करून घेण्याचे आवाहन महापालिकेसमोर उभे ठाकले आहे.दरम्यान, सिडको विकसित नोडमधील कचरा उचलण्याचे काम सुमारे ७00 सफाई कामगारांच्या माध्यमातून केले जाते. मागील अनेक वर्षापासून हे कामगार कार्यरत आहेत. सिडकोकडून ही सेवा महापालिकेकडे वर्ग झाल्यास आमचे काय होणार, असा प्रश्न या कामगारांना भेडसावत आहे. त्यामुळे ही सेवा वर्ग करण्याअगोदर महापालिकेने या सर्व कामगारांना आपल्या सेवेत समावून घ्यावे, अशी मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कामगार संघटनेने न्यायालयात धाव घेतली असून, या कामगारांना सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कचरा निर्मूलन सेवेच्या हस्तांतरणाच्या मार्गत हासुद्धा मोठा अडथळा असल्याचे बोलले जात आहे.कचरा हस्तांतरण करून घेण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही यंत्रणा हस्तांतरित करून घेतली जाईल. त्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.- संध्या बावनकुळे,उपायुक्त, पनवेल महापालिकाकचरा हस्तांतरणात सफाई कामगार भरडला जाणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. सिडको नोड मध्ये २५ वर्षांपासून काम करणारे सफाई कामगार आहेत. त्यांना पूर्ण वेळ सेवेत घेतल्यानंतर हस्तातरणाचा निर्णय घ्यावा. या मागणीसाठी आम्ही औद्योगिक न्यायालयात दाद मागितली आहे.- बि. के. राजे,अध्यक्ष,महाराष्ट्र कामगार संघटना
पनवेलमधील कच-याचा यक्ष प्रश्न, स्वच्छतेसाठी सिडकोवर मदार, स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात महापालिकेला अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 4:55 AM